सरपंच महिलेने वाढविली यंत्रणेची डोकेदुखी! आधी राजीनामा, पुन्हा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 10:05 AM2023-05-07T10:05:20+5:302023-05-07T10:07:30+5:30
थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक झाल्याने सरपंच व सदस्यपदासाठी तिने नामांकन दाखल केले.
नरेंद्र जावरे
चिखलदरा (जि. अमरावती) : थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक झाल्याने सरपंच व सदस्यपदासाठी तिने नामांकन दाखल केले. दोन्ही जागांवर निवडून आली. सात दिवसांच्या आत एका जागेचा राजीनामा द्यावा लागत असल्याने सदस्यपद त्यागले. रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागली आणि सरपंच असलेल्या महिलेने पुन्हा सदस्यपदासाठी नामांकन दाखल केले. निवडून आल्यास पुन्हा एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. राजकीय कुरघोडीचा हा भाग स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. नियमावली तपासूनसुद्धा मिळत नसल्यामुळे थेट निवडणूक आयोगाकडेच आता मार्गदर्शन मागितले जाणार आहे. ही घटना चिखलदरा तालुक्याच्या चिचखेडा ग्रामपंचायतमध्ये घडली. या पेचप्रसंगाने संपूर्ण राज्यासह देशातील ग्रामपंचायती व इतर निवडणुकांसाठी आयोगाला नियमावली तयार करावी लागणार आहे.
चिंचखेडा ग्रामपंचायतमध्ये गतवर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत हिराय किशोर चव्हाण या थेट जनतेतून असलेल्या सरपंचपदी आणि सदस्यपदावरही निवडून आल्या. नियमानुसार त्यांनी सात दिवसांच्या आत सदस्यपदाचा राजीनामा दिला.
१८ ला मतदान
रिक्त जागेसाठी १८ मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. परंतु, सरपंच चव्हाण यांनी पुन्हा राजीनामा दिलेल्या त्याच सदस्यपदाच्या जागेसाठी नामांकन दाखल केले आहे. या बाबीला माजी सरपंच आशाय बाबूलाल साकोम यांनी हरकत घेतली.
मग पुन्हा राजीनामा...
अनुसूचित जमाती महिला राखीव सदस्यपदासाठी १८ मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. विद्यमान सरपंच या सदस्यपदावर निवडून आल्यास पुन्हा त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल आणि पुन्हा तोच खेळ चालत राहणार का, असा प्रश्ननिर्माण झाला आहे.
चिचखेडा येथील सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान सरपंच व एक महिला यांचे नामांकन आहे. सरपंचाने सदस्यपदाचा राजीनामा देऊन पुन्हा नामांकन दाखल केले. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला मार्गदर्शन मागितले.
- गजानन राजगडे, प्र. तहसीलदार, चिखलदरा