आयआयएमसी अमरावतीच्या प्रादेशिक संचालकाविरुद्ध अॅट्रॉसिटी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 04:52 PM2022-02-22T16:52:24+5:302022-02-22T17:37:22+5:30
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन(आयआयएमसी) अमरावतीच्या प्रादेशिक केंद्रात संचालकपदी असलेले अनिल कुमार सौमित्र यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्थित भारतीय जनसंचार संस्थेच्या (आयआयएमसी) संचालकाविरूद्ध सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याबाबत तेथीलच विनय सोनुले (३८) या सहायक प्राध्यापकाने तक्रार नोंदविली होती. सोमित्र यांनी आपला लो सर्वांसमक्ष अपमान केल्याचा त्यांचा आरोप आहे.
भारतीय जन संचार संस्थेच्या अमरावती पश्चिमी विभागीय केंद्राचे अभ्यासक्रम निर्देशक अनिल कुमार सौमित्र असे गुन्हा दाखल झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. प्रो. सौमित्र यांच्यावर एससी/एसटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा. सौमित्र यांच्यावर मानसिक छळ, अपमानजनक टिप्पणी व विद्यार्थ्यांसमक्ष रागवण्यात आल्याचा आरोप आहे. जुलै २०२१ पासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारकर्ते प्रा. सोनुले यांचे म्हणणे आहे. यासोबत परीक्षेच्या दिवशी प्रभारी पदावरून हटवण्यात आलं असल्याचही ते म्हणाले आहेत.
भारतीय जनसंचार संस्थान हे माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली प्रमूख स्वायत्त संस्था आहे, जी पत्रकारितेच्या दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाते. या संस्थेच्या पाच केंद्रांपैकी एक असलेल्या अमरावती येथील केंद्राच्या संचालकपदी अनिल कुमार सौमित्र आहेत. मध्यंतरी त्यांनी महात्मा गांधी हे पाकिस्तानचे जनक असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तर, आता प्राध्यापकाला त्रास दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.