नवरा नपुंसक; म्हणाला वाच्यता केल्यास बहिणीचे लग्न मोडेल, विवाहितेला घराबाहेर हाकलले
By प्रदीप भाकरे | Published: April 28, 2023 02:15 PM2023-04-28T14:15:32+5:302023-04-28T15:46:50+5:30
मानसिक, शारीरिक छळ
अमरावती : ‘मी नपुंसक आहे, मात्र त्याबाबत कुणालाही सांगू नकोस, चुकुनही वाच्यता केलीस, तर तुझ्या बहिणीचे लग्न होऊ देणार नाही, अशी गर्भित धमकी एका विवाहितेला देण्यात आली. पुढे जाऊन तिला अंगावरील कपड्यावर घराबाहेर हाकलून देण्यात आले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी २७ एप्रिल रोजी पिडिताच्या नपुंसक पतीसह तिच्या सासरकडील अन्य तिघांविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी हे सुफियाननगर नंबर २ येथील रहिवासी आहेत.
तक्रारीनुसार, ६ जून २०२१ रोजी पिडिताचे शाकीर (२७) नामक तरूणाशी लग्न झाले. लग्नानंतर लगेचच साकी हा नपुंसक असल्याचे पिडिताच्या लक्षात आले. तिने ती बाब भासरा, सासू व सासऱ्याला सांगितली. मात्र त्याबाबत कुणालाही काहीही सांगू नकोस, डॉक्टरांच्या उपचाराने तो बरा होईल, अशा शब्दात तिची बोळवण करण्यात आली. दरम्यान आठवडयानंतर ती माहेरी आली. पतीच्या नपुंसकतेबाबत त्यांना देखील सांगितले. मात्र त्यांनी मुलीचा संसार सुखात राहावा यासाठी तिला पुन्हा सासरी पाठवले. तिच्या आईवडिलांनी जावई शाकीर याला समजावले. मात्र त्याने तिला अश्लिल शिविगाळ केली. त्याचे कुटुंबिय सुनेसह तिच्या आई वडिलांना मारण्यासाठी प्रोत्साहन देत होते.
तो तिला टाळू लागला
सासरी परतल्यानंतर पिडिताने नवऱ्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली. त्यावेळी त्याने त्यास नकार दिला. याबाबत कुणाला बोललीस तर तुझ्या बहिणीचे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तो त्याच्या खोलीत न झोपता दुसऱ्याच खोलीत झोपू लागला. तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
दागिणे हिसकावले
१९ मे २०२२ रोजी आरोपी शाकीर याने तिला बेदम मारहाण केली. तिला अंगावरच्या कपड्यावर घरातून हाकलून दिले. तसेच तिच्या अंगावरील दागिणे हिसकावून घेतले. ही बाब तिने माहेरी कळविली. त्यामुळे ते तिला घेऊन माहेरी परतले. मात्र त्यानंतरही आरोपीने तिचा पिच्छा सोडला नाही. त्यामुळे अखेर २७ एप्रिल रोजी सायंकाळी तिने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले.