‘नमो’ खुलवणार अमरावती, तिवसा, चिखलदऱ्याचा चेहरा; स्वच्छतेतून आरोग्यसंवर्धन
By प्रदीप भाकरे | Published: October 23, 2023 04:42 PM2023-10-23T16:42:36+5:302023-10-23T16:42:44+5:30
आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी, ‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’ राबविण्यासाठी राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे.
अमरावती : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील ७३ शहरांमध्ये ‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’ राबविले जाणार आहे. यात पश्चिम विदर्भातील नऊ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. नागरी भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी, त्यांना सुखसोयी मिळण्यासाठी, त्याचप्रमाणे शहरांचे सौंदर्य टिकून राहावे, यासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर शहर सौंदर्यीकरण अभियान राबविले जाणार आहे. ‘नमो’ अमरावती, तिवसा, चिखलदऱ्याचा चेहरा खुलवणार आहे.
‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’ राबविण्यासाठी राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे. यात अमरावती महापालिका, चिखलदरा नगर परिषद व तिवसा या नगर पंचायतीचा समावेश आहे. हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी लोकप्रतिनिधी, समाजसुधारक, प्रसिद्ध व्यक्ती यांची स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध स्पर्धा-निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजित करण्याचे निर्देश शासनाच्या उपसचिव सुशीला पवार यांनी संबंधित आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अभियानात काय?
शहरातील जलाशय, पाणीसाठे यांची स्वच्छता करून सौंदर्यीकरण, शहरातील बागबगीचे/उद्याने, खेळाची मैदाने यांची स्वच्छता करून त्याठिकाणी आवश्यक ते सुशोभिकरण, खेळाचे साहित्य व इतर आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता, पादचारी मार्ग/पथ, विविध प्रकारची फुलांची झाडे, विविध मैदानी खेळांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, दुभाजक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे, तेथे भित्तीचित्रे, कारंजे, शिल्प उभारणे व सामाजिक संदेश देणारे व जनजागृती करणारे चित्र रेखाटणे.
यांचीही स्वच्छता, सौंदर्यीकरण अनिवार्य
शहरातील प्रमुख इमारती, शाळा, महाविद्यालये, हेरिटेज इमारती, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, झोपडपट्टी, गावठाण परिसर यांची स्वच्छता करून सौंदर्यीकरण करावे. शहरातील बाजारपेठा, व्यावसायिक ठिकाणे, सार्वजनिक शौचालये यांची स्वच्छता करून त्याठिकाणी सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश महापालिका व नगर परिषदांना देण्यात आले आहेत.
कार्यगट करेल अंमलबजावणी
नमो ११ कलमी कार्यक्रमांतर्गत शहर सौंदर्यीकरण अभियानांतर्गत निवड केलेल्या शहरांमध्ये ‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’ राबविण्याकरिता संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यगट स्थापन केला जाईल. आयुक्त/मुख्याधिकारी कार्यगटाचे अध्यक्ष असतील. तर शहर अभियंता, नगर अभियंता, नगररचनाकार, आरोग्य व स्वच्छता अधिकारी हे सदस्य असतील. अधिकृत बांधकाम विकासक संघटना, वास्तुविशारद, कलाकार, प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी देखील यात असतील.