अमरावती येथे मराठा उद्योजकांचे महाअधिवेशन थाटात
By गणेश वासनिक | Published: January 22, 2024 04:38 PM2024-01-22T16:38:41+5:302024-01-22T16:39:16+5:30
यावेळी उद्योग क्षेत्रात भरारी घेणाऱ्या मराठा उद्योजकांनी मुलाखतीत सक्सेस स्टोरी अनुभवातून कथन केली.
अमरावती :मराठा सेवा प्रणीत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्यावतीने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मराठा उद्योजकांचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवारी थाटात पार पडले. यावेळी उद्योग क्षेत्रात भरारी घेणाऱ्या मराठा उद्योजकांनी मुलाखतीत सक्सेस स्टोरी अनुभवातून कथन केली.
अधिवेशनाची सुरूवात माॅ जिजाऊचे वंदन त्यानंतर मॉ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजनाने करण्यात आली. अधिवेशनाचे उद्घाटन हावरे ईंजिनिअरींग ॲन्ड बिल्डर्सच्या प्रबंध संचालक उज्ज़्वला हावरे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे होते. यावेळी मंचावर मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकर, माजी मंत्री तथा आमदार
प्रवीण पोटे पाटील, मराठा उद्योजक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, मराठा उद्योजक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश ठाकरे, महाअधिवेशन आयोजन समितीचे प्रमुख श्रीकांत मानकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नीलेश ठाकरे यांनी केले.
दरम्यान उज्ज़्वला हावरे यांनी युवकांना उद्योग क्षेत्रात येण्याचे आवाहन केले. मराठा समाज राजकारण, समाजकारणात आघाडीवर आहे, पण उद्योगात कधी पुढे येणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रत्येकाच्या यशामागे एक सक्सेस स्टोरी असते. संघर्ष असते. त्यामुळे युवकांना उद्योग क्षेत्रात आणण्यासाठी त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा मिळणे काळाची गरज आहे. उद्योग लहान असो वा मोठा यापेक्षा आपले श्रम आणि जिद्द फार महत्वाची ठरणारी आहे. युवकांनी उद्योग उभारणीसाठी पुढे यावे, सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, समारोपीय सत्रात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते यशस्वी उद्योजकांना व अधिकाऱ्यांनाही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या सत्रात यशस्वी उद्योजकांची मुलाखत घेण्यात आली. मिलिंद देशमुख, प्रभाकर देशमुख, अविनाश पाटील, उज्ज्वल साठे यांनी उद्योग क्षेत्रातील यशाचे अनुभव कथन केले. क्षीप्रा मानकर व सारंग राऊत यांनी उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या. या कार्यक्रमाला आ. प्रवीण पोटे, महापालिका आयुक्त देवीदास पवार, मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश ठाकरे, मराठा सेवासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे, राजेंद्रसिंह पाटील, श्रीकांत मानकर आदी उपस्थित होते.