‘हॅलो, मी आत्महत्या करतोय’ म्हणत तो फासावर झुलला, कुकची आत्महत्या
By प्रदीप भाकरे | Published: December 20, 2022 07:28 PM2022-12-20T19:28:27+5:302022-12-20T19:29:22+5:30
‘हॅलो, मी आत्महत्या करतोय’ म्हणत एका कुकने आत्महत्या केली आहे.
अमरावती : ‘हॅलो,पोलीस ना, मी चपराशीपुऱ्यातून बोलतोय, मी आत्महत्या करतोय. या कॉलने डायल ११२ वरील बिटमार्शल जरासा गोंधळलाच. मात्र, त्याने कुठून बोलता, अशी सुरूवात करत आत्महत्या न करण्याची विनवणी केली. काही वेळातच डायल ११२ चे वाहन तेथे पोहोचले. पोलिसांनी त्याच मोबाईल क्रमांकावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन करणारा व्यक्ती दिसलाच नाही. तर त्याचा मोबाईल देखील बंद होता. दरम्यान, २० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास चपराशीपुरा शुक्रवार बाजार परिसरातील रुग्णालयाच्या आवारात एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. चौकशीअंती तो मृतदेह रात्रीला कॉल करणाऱ्या व्यक्तीचाच असल्याचे निष्पन्न झाले.
फ्रेजरपुरा पोलिसांनुसार, रामेश्वर मारोतराव सोनोने (४२, रा. खंडाळा ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृतकाचे नाव आहे. रामेश्वर सोनोने हे अमरावती चांदूर रेल्वे मार्गावरील एका वॉटर पार्कमध्ये 'कुक' म्हणून काम करत होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी डायल ११२ वर पोलिसांना फोन करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले. रात्री उशिरा फोन आल्यानंतर पोलिसांनी संबधित मोबाईल क्रमांकावर पुन्हा कॉल करून कोण व कुठून बोलत आहे, हे विचारले तसेच आत्महत्या करू नका, आम्ही पोहचत आहोत, असे सांगून त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोनोने यांनी पोलिसांना ते कुठे आहे, याबाबत माहिती न देताच तुम्ही पोलीस आहात, तुम्हीच माझा शोध घ्या, असे म्हणून मोबाईल कट केला. त्यानंतर सोनोने यांनी मोबाईल ‘स्विच ऑफ’ केला.
मोबाईलवरून पटली मृताची ओळख
चपराशीपुरा भागातील मनपा रुग्णालयाच्या परिसरात एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास फिरोज नामक व्यक्तीने फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतकाजवळ असलेला मोबाईल सुरू केला. त्यातील कॉल लॉगमध्ये डायल ११२ चा कॉल देखील आढळून आला. त्याचवेळी रामेश्वर सोनोने यांच्या पत्नीचा कॉल देखील त्यावर आला. त्यामुळे मृताची ओळख पटून रात्रीच्या वेळी डायल ११२ वर कॉल करून आत्महत्या करतो आहे, असे म्हणणाऱ्या व्यक्तीचाच अर्थात रामेश्वरचा तो मृतदेह असल्याची खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
जुगारस्थळीच आत्महत्या?
रामेश्वर सोनोने हे शुक्रवार बाजार परिसरात चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर रात्रभर जुगार खेळले. त्यात ते हरल्याने त्यांनी पहाटेच्या सुमारास तेथेच जुगार चालणाऱ्या शेडमध्येच गळफास घेतल्याची बाब सकाळी सोशल व्हायरल झाली. पोलिसांनी घटनास्थळ बदलल्याचा आरोप देखील चर्चेतून करण्यात आला. मात्र, फ्रेजरपुरा पोलिसांनी ती बाब सपशेल नाकारली. त्याने मनपा दवाखान्याच्या आवारातील पार्किंगस्थळी आत्महत्या केल्याची माहिती फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी दिली.