दहा महिन्यात एमपीडीएचे दशक, कुख्यात बिट्टू वर्षभरासाठी कारागृहात
By प्रदीप भाकरे | Published: October 25, 2024 01:01 PM2024-10-25T13:01:07+5:302024-10-25T13:02:00+5:30
अजून तिघे रडारवर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन
प्रदीप भाकरे
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून फ्रेजरपुरा हद्दीतील कुख्यात गुन्हेगार रूपेश ऊर्फ बिटटु विनोद वानखडे (२३, रा. पंचशील नगर) याच्याविरूध्द एमपीडीएची कारवाई करण्यात आली. त्याला २४ ऑक्टोबर रोजी वर्षभरासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षात दहा जणांविरूध्द एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून, अन्य तिन ते चार जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
कुख्यात गुन्हेगार रूपेश ऊर्फ बिटटु विनोद वानखडे हा सन २०२२ पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याच्याविरूध्द फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अश्लील शिवीगाळ, गंभीर दुःखापत, गृह अतिक्रमण, घातक शस्त्र बाळगणे, अधिसुचना व हद्दपार आदेशाचे उल्लघंन असे एकुण १६ गुन्हे दाखल आहे. त्याच्याविरूध्द यापुर्वी प्रतिबंधक कारवई करण्यात आली. त्याला तडीपार सुध्दा करण्यात आले होते. तरी सुध्दा तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याने त्याच्याविरूध्द फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार निलेश करे यांनी एसीपी कैलास पुंडकर, उपायुक्त सागर पाटील व कल्पना बारवकर यांच्या मार्फत पोलीस आयुक्तालयात एमपीडीएचा प्रस्ताव पाठविला. एसीपी शिवाजी बचाटे व पोलीस निरिक्षक सिमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील एमपीडीए सेलमधील सहायक पोलीस निरिक्षक इम्रान नायकवडे, अंमलदार विनय गुप्ता, अजय मिश्रा. चेतन कराडे, विनोद इंगळे यांनी पुर्तता केली. त्यावर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी २४ ऑक्टोबर रोजी आदेश पारीत केले. ठाणेदार करे यांनी ते आदेश तामिल करून त्याला स्थानबध्दतेच्या कालावधीकरीता मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.
काय आहे एमपीडीए
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.