बाहेरून ढाबा, आतून मात्र देशी-विदेशीचा बार!
By प्रदीप भाकरे | Published: October 3, 2024 05:02 PM2024-10-03T17:02:14+5:302024-10-03T17:03:51+5:30
राजापेठ पोलिसांची कारवाई : दारूसह, मोबाइल, रोख जप्त
अमरावती : ‘बाहेरून कीर्तन, आतून तमाशा’ या धर्तीवर एका ढाब्याच्या आत सुरू असलेल्या ओपन देशी-विदेशी बारवर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. तेथून देशी-विदेशी दारूसह मोबाइल व रोकड जप्त करण्यात आली. २ ऑक्टोबर रोजी राजापेठचे नवनियुक्त ठाणेदार पुनित कुलट यांच्या नेतृत्वातील डीबी स्कॉडने ही कारवाई केली.
याप्रकरणी, ढाबाचालक मोहन रामशंकर चौबे (६२, रा. पवननगर नंबर १, गोपालनगर) याला अटक करण्यात आली. मोहन चौबे याच्या पवननगरस्थित मालकीच्या करण ढाब्यावर ही कारवाई करण्यात आली. डीबी स्कॉडप्रमुख पोलिस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे हे पथकासह पेट्रोलिंग करत असताना करण ढाब्यावर देशी-विदेशी दारू विक्री केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याआधारे तेथे धाड टाकण्यात आली. तेथून देशी, विदेशी दारूच्या बॉटल्स, रोख रक्कम, सहा मोबाइल तथा डीव्हीआरसह जुगारासाठी वापरण्यात येणारे ताश पत्ते असा एकूण ६४ हजार ३३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देशी-विदेशी दारू विक्रीसह तेथे जुगार देखील भरवला जात असल्याचे उघड झाले. डीबी स्कॉडचे जमादार मनीष करपे, अंमलदार पंकज खटे, रवी लिखितकर, गणराज राऊत, सागर भजगवरे, माया अंबुलकर यांनी ही कारवाई केली.