‘त्या’ खास अंमलदारांच्या कार्यमुक्तीवर खाकीकडून ‘डॉगवॉच !’

By प्रदीप भाकरे | Published: October 25, 2022 05:18 PM2022-10-25T17:18:34+5:302022-10-25T17:19:36+5:30

पोलीस दलाचे लक्ष : ‘ते जात असतील, तर आम्ही बदलीस्थळी जाऊ’ अनेकांचा पवित्रा

A 'dog watch' is being kept by the police on the release of special enforcers | ‘त्या’ खास अंमलदारांच्या कार्यमुक्तीवर खाकीकडून ‘डॉगवॉच !’

‘त्या’ खास अंमलदारांच्या कार्यमुक्तीवर खाकीकडून ‘डॉगवॉच !’

Next

अमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या आदेशाने प्रभारी पोलीस उपायुक्त प्रशांत राजे यांनी २१ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस निरिक्षक ते पोलीस शिपाई अशा एकूण २९९ अंमलदारांमध्ये अंतर्गत खांदेपालट केला. पैकी १० अंमलदारांची निवृत्ती जवळ आल्याने त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली. तर, ४६ जणांना वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली. उर्वरित बदलीपात्र अंमलदारांनी तातडीने बदलीस्थळी रुजू व्हावे, असा आदेश देण्यात आला. मात्र, बहुतांश अंमलदारांनी त्या आदेशाची तूर्तास अंमलबजावणी केली नाही. पोलीस दलात ‘खास’ म्हणून ओळख असलेले अंमलदार बदलीस्थळी रुजू होतात की कसे, यावरही अनेकांची कार्यमुक्ती अवलंबून असल्याची शहर पोलिसांमध्ये बोलले जात आहे. ‘त्या’ खास अंमलदारांच्या कार्यमुक्तीवर खाकीकडून ‘डॉगवॉच’ ठेवला जात आहे.

ठाणेदारांसह वाहतूक पोलीस निरीक्षकांचे रायटर, ठाण्यातील खुफिया व डीबीमध्ये ‘सिव्हिल’मध्ये राहणाऱ्या अंमलदाराचा त्या त्या ठाण्यात, वाहतूक शाखेत प्रभावी अंमल असतो. ते प्रमुखांच्या गुडबुकमध्ये असतात. त्यामुळे अशा मर्जीतील अंमलदारांच्या बदल्या झाल्या, तरी ते प्रभाव वापरून आपली बदली रद्द करतात, हा पूर्वानुभव आहे. ते ते संबंधित प्रमुख देखील आपली बाजू कुमकुवत होऊ नये (तपास वा डिटेक्शनची) यासाठी वरिष्ठांकडे अशा ‘लेफ्ट राईट’ असलेल्यांची बदली प्रमुख कर्तव्य म्हणून रद्द करण्यासाठी प्रयत्न करतात अन् प्रशासकीय कामकाज नीट चालावे म्हणून एक वर्ष मुदतवाढ अशा सबबीखाली त्या बदल्या रद्द केल्या जातात. तसा पूर्वानुभव पाहता अनेक ‘खास’ अंमलदारांनी बदली रद्दचे जोरकस प्रयत्न चालविले आहेत. मात्र, प्रशासकीय शिस्तीच्या भोक्त्या असलेल्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्याकडे कुणी रद्द बदली करावी, यासाठी अनेकांचे घोडे अडले आहे.

या अंमलदारांना पोलीस निरीक्षक सोडणार का ?

पूर्व आणि पश्चिम वाहतूक शाखेत आपल्या कार्यकतृत्वाची अमिट छाप सोडणाऱ्या दोन्ही रायटरची बदली झाली आहे. पूर्वेच्या मनीष करपे यांना राजापेठ, तर पश्चिमचे शंकर बावनकुळे यांना नागपुरी गेट पोलीस ठाण्यात बदलीवर पाठविण्यात आले आहे. मात्र, त्यांना वाहतूक शाखेतून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. याशिवाय राजापेठचे ‘मोस्ट एनर्जिटिक’ राहुल ढेंगेकर वाहतूक पश्चिममध्ये, तर कोतवाली ठाणे एकहाती चालविण्याचा कसब राखणाऱ्या मनीष सावरकर यांची बदली गाडगेनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गाडगेनगरमध्ये कार्यरत प्रशांत भोंडे यांची बदली कोतवालीत करण्यात आली आहे. यासह अनेक अंमलदारांना संबंधित पोलीस निरीक्षक सोडतील का, यावर आदेशाची अंमलबजावणी अवलंबून आहे.

बुधवारी, गुरुवारी कार्यमुक्ती ?

मध्यंतरी दिवाळीच्या सुट्या व बंदोबस्त असल्याने आपल्याला ठाणेदार वा पोलीस निरीक्षकांनी सोडले नसल्याचा काही बदलीप्राप्त अंमलदारांनी केला आहे. आम्ही आदेश पाळणारे आहोत. मात्र, प्रमुखांनी वेळेत कार्यमुक्त केले तरच बदलीस्थळी रुजू होता येईल ना, असा सूरही अनेकांनी आवळला आहे. प्रत्यक्षात काहींनी बदली थांबविण्यासाठी जोरकस प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: A 'dog watch' is being kept by the police on the release of special enforcers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.