महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर ओतले पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 01:03 PM2022-11-22T13:03:53+5:302022-11-22T13:26:35+5:30

कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी केला होता अर्ज

A farmer attempted self-immolation in the Mahavitaran office daryapur | महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर ओतले पेट्रोल

महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर ओतले पेट्रोल

googlenewsNext

 दर्यापूर (अमरावती) : सन २०२० मध्ये कृषिपंपाच्या जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर प्रतीक्षा हाती आलेल्या खोलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिंगणापूर येथील शेतकऱ्याने सोमवारी दर्यापूर येथील महावितरण कार्यालयात पेट्रोल अंगावर घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

शिंगणापूर येथील शेतकरी अमोल मनोहरराव जाधव यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी २०२० मध्ये दर्यापूर महावितरण कार्यालयात कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना वीजजोडणी करून देण्यात आली नाही. वारंवार वीज कार्यालयात चकरा मारून थकलेल्या संतप्त शेतकऱ्याने सोमवारी दुपारी तीन वाजता दर्यापूर येथील महावितरण कार्यालयात जाऊन स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने आजूबाजूला उपस्थित असलेल्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी अमोल जाधव यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. यामुळे कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली होती. याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी उपकार्यकारी अभियंता चेतन मोहोकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी रजेवर मुंबईला असल्याचे सांगितले.

शेतकऱ्याचा अर्ज २०२० मध्येच मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी कार्यालयाशी कधीही संपर्क केला नाही. त्यांची वीजजोडणी होऊ शकली नाही. हे शेतकरी अवैध वीजजोडणी घेऊन वीज वापर करीत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

- आर. एम. अजमिरे, सहायक अभियंता, शिंगणापूर.

Web Title: A farmer attempted self-immolation in the Mahavitaran office daryapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.