१४ एकरमधील सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरविला ट्रॅक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 11:40 AM2024-09-18T11:40:55+5:302024-09-18T11:41:36+5:30
सततच्या पावसाने नुकसान : पिकाची वाढ खुंटली, फुले, शेंगा नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
कावली: वसाड धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड परिसरात चिंचपूर येथील शेतकरी प्रदीप बांबल यांनी १४ एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. सततच्या पावसाने सोयाबीनची वाढ खुंटली व फुले, शेंगा नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
बांबल यांनी १४ एकरमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती.. मात्र, दीड महिन्यापासूनच्या पावसाने सोयाबीनची वाढ खुंटली, पिवळे पडले, पिकाला फुले- शेंगा पकडल्याच नाही. त्यामुळे पिकाचे उत्पन्न होण्याची शक्यता नसल्याने त्यांनी सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरविला आहे. यंदा सततचा पाऊस, ढगाळ वातावरण, अतिवृष्टी यामुळे पिकांची वाढ खुंटली, त्यामुळे उत्पादन होण्याची शक्यता नसल्याने बांबल यांनी सांगितले. या परिसरात कपाशी, सोयाबीन, तूर पिकाचे सततचा पाऊस व अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेले आहे.
रब्बीत पेरणी करणार खरिपाचा खर्च वाया सोयाबीनवर आतापर्यंत दोन ते अडीच लाखांचा खर्च झालेला आहे. मात्र, उत्पादन खर्च तर दूर पेरणीचा खर्चही निघणे कठीण असल्याने सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरविला आहे. या शेतामध्ये रब्बी हंगामातील गहू व हरभरा लावणार आहे. मात्र, खरिपाचा खर्च पूर्ण वाया गेल्याचे बांबल म्हणाले.
"१४ एकर सोयाबीनला आतापर्यंत अडीच लाखाचा खर्च झालेला आहे. मात्र, सततच्या पावसाने पिकाची वाढ खुंटली व सोयाबीनला फुले, शेंगा नसल्याने उत्पादनाची अपेक्षा नाही, त्यामुळे पिकावर ट्रॅक्टर फिरविला."
-प्रदीप बांबल, शेतकरी, चिंचपूर