शेतकऱ्याला मारहाण करून विष्ठा खाण्यास भाग पाडले; अमरावती जिल्ह्यातील संतापजनक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 03:35 PM2022-06-04T15:35:06+5:302022-06-04T16:42:19+5:30
तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली.
अमरावती : पूर्व वैमनस्यातून एका ४५ वर्षीय व्यक्तीला चक्क मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडण्यात आले. वरूड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे २६ मे रोजी दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी बबन आत्माराम बुरंगे (६०), सुरेश आत्मारामजी बुरंगे (५०), भूषण बबन बुरंगे (३२) व राजेंद्र उर्फ राजा श्रीराम ठाकरे (५०, सर्व रा. नांदगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, नंदकुमार बुरंगे (४५) व आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात शेताच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून जुना वाद होता. दरम्यान, २६ मे रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास नंदकुमार बुरंगे हे शेतातून गावात येत असताना आरोपींची आणि त्यांची नजरानजर झाली. तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. याशिवाय भूषण बुरंगे व राजेंद्र ठाकरे यांनीदेखील आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे नंदकुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर भूषण बुरंगे याने राजेंद्र ठाकरे याला विष्ठा आणण्यास सांगितले. ती विष्ठा आरोपींनी माझ्या तोंडात कोंबली, ती खाण्यास भाग पाडले, अशी तक्रार नंदकुमार बुरंगे यांनी २ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नोंदविली. विशेष म्हणजे, यात कोरोना कलम म्हणून प्रसिद्ध भादंविचे कलम २६९, २७० त्यापश्चात पहिल्यांदाच यात वापरली आहे.
काय आहे कलम २६९, २७० ?
कलम २६९ म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी होणारी निष्काळजीपणाची कामे जी दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात आणू शकते आणि कलम २७० म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी केलेली प्राणघातक किंवा हानिकारक कृती ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात येते. हे दोन्ही कलमे भारतीय दंड संहितेच्या १४ व्या अध्यायांतर्गत आहेत, ज्यात सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा, आनंद, शिष्टाचार आणि नैतिकतेवर परिणाम करणारे गुन्हे समाविष्ट आहेत, तर आयपीसीच्या कलम २६९ अन्वये गुन्हेगारास सहा महिने किंवा दंड किंवा दोन्ही आणि कलम २७० अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
मानवी विष्ठा आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे या प्रकरणात कलम २६९, २७० नुसार गुन्हा दाखल करून चारही आरोपींना ताब्यात घेतले.
मिलिंद सरकटे, ठाणेदार, बेनोडा