भंगाराच्या गोदामाला भीषण आग; चांदूर बाजारातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 01:51 PM2022-03-10T13:51:17+5:302022-03-10T15:45:10+5:30
३० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
चांदूर बाजार (अमरावती) : स्थानिक मुस्लिम कब्रस्तानच्या मागे असलेल्या एका भंगार गोदामाला अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून ५० हजार रुपयांचे भंगार जळाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. स्थानिक अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे ही आग अवघ्या अर्धा तासात आटोक्यात येण्यास यश मिळाले.
परतवाडा मार्गावर असलेल्या मुस्लिम कब्रस्तानमागे खुल्या जागेत अमरावती येथील शेख नजीब शेख हबीब यांनी टिनाचे गोदाम बनविले होते. या गोदामात भंगार, प्लास्टिक, चपलांचा माल ठेवला होता. या गोदामला अचानक आग लागल्याने यातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती परिसरातील नागरिकांनी ठाणेदार सुनील किनगे यांना दिली. पोलीस ताफ्यासह नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पालिकेचे कर्मचारी संतोष डोळे, राजेश उसरबरसे, रमेश आमझरे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी परिसरातील नागरिकांनीसुद्धा आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. ३० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, गोदामात ठेवलेले भंगार टायर, प्लास्टिकच्या वस्तू जळून खाक झाल्या. आगीमध्ये ५० हजार रुपयांचे भंगार साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती नगरपालिका व पोलीस विभागाने दिली आहे.