'शेअर'मध्ये ७४ लाखांना गंडा नऊ जणांची टोळीच पकडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 14:37 IST2024-06-25T14:37:05+5:302024-06-25T14:37:34+5:30
आरोपी आंतरराज्यीय : मोबाइल, चेकबुक, रोकडही जप्त

A gang of nine people does a fruad of 74 lakhs in 'Share'
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ४० वर्षीय महिलेची शेअर खरेदी विक्री व्यवहारात तब्बल ७४ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलिसांनी मुंबईतील जोगेश्वरी भागातील एका हॉटेलमधून २३ जून रोजी नऊ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून रोख, मोबाइल व अन्य सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी माध्यमांना दिली. ते आरोपी हरयाणा, आसाम, राजस्थान, उत्तरप्रदेश, जोगेश्वरी पश्चिम मुंबई व नागपूर येथील रहिवासी आहेत. ७४ लाखांपैकी ४० लाख रुपये सायबर पोलिसांनी गोठविले आहेत.
अटक आरोपींमध्ये सुनील हनुमान (३०), विक्रम जिलेसिंग (४१, दोघेही रा. फतेहबाद, हरयाणा), परान अली जमालउद्दीन (१९, जि. कामृप, आसाम), अमन कुमार प्रेमचंद (५०, रा. जि. जयपूर, राजस्थान), मो. मरुफ मो. हमीद (२४), सौरभ बलिंद्रकुमार तिवारी (२३, रा. दोघेही उत्तरप्रदेश), मो. साबिर असुब शेख (१९), फराज खान असिफ खान (१९, दोघेही रा. जोगेश्वरी पश्चिम मुंबई) व विमल मानकलाल काटेकर (३१, रा. नागपूर) यांचा समावेश आहे. अटक आरोपींकडून १८ मोबाइल, २३ डेबिट व क्रेडिट कार्ड, १८ चेकबुक, इंडिगो विमानाचे सहा टिकीट, स्टॅप व २.२८ लाख रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. मूळ फसवणुकीच्या गुन्ह्यात गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्यासह अन्य तीन कलमे देखील वाढविण्यात आली आहेत.
अशी झाली फसवणूक
पापळ येथील एका महिलेची शेअर मार्केट संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपवर ७४ लाख १९ हजार रुपयांनी फसवणूक झाली. शेअर ट्रेडिंगकरिता त्यांनी ती रक्कम पाठविली. त्या अॅपवर शेअर खरेदीविक्री करीत होत्या. फिर्यादीला त्यांच्या खात्यात नफा दिसत होता. मात्र रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता विड्रॉल झाला नाही. त्यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.
मुंबईतून व्यवहार
सायबर पोलिस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलवाल यांनी तांत्रिक विश्लेषण केले असता, भारताबाहेर विविध देशात बसून काही व्यक्तींचा समूह संगनमत करून अशाप्रकारे गुन्हे करण्यास प्रवृत्त करून गुन्ह्याचा कट रचत असल्याचे समोर आले. मुंबईतील अंबोली ठाण्याच्या हद्दीतील जोगेश्वरी पूर्व भागातील एका महागड्या हॉटेलमध्ये बसून काही जण भारतभर फसवणूक झालेली रक्कम मुख्य आरोपीपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती.