परतवाड्यात दुचाकी चोरांची टोळी गजाआड, जंगलात खड्डा करून लपवून ठेवल्या दुचाकी
By गणेश वासनिक | Published: December 7, 2022 08:29 PM2022-12-07T20:29:30+5:302022-12-07T20:30:58+5:30
अल्पवयीन मुलांचा वापर, सुटे भाग करून लपवायचे गाड्या
परतवाडा : अल्पवयीन मुलांच्या सहकार्याने दुचाकी चोरायची व त्यानंतर तिचे सुटे भाग करून ते भंगार विक्रेता व इतर ठिकाणी विकायची, त्यात हातखंडा असलेल्या आरोपीला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. मोठ्या प्रमाणात दुचाकींचे सुटे भाग विकल्याचा प्रकार या घटनेने पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, यातील दुचाकी नजीकच्या हत्तीघाट परिसरातील जंगलात लपवून ठेवल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
अंकुश गणेश दुरतकर (२०, रा. रामनगर, परतवाडा), पवन गजानन तनपुरे (१९, रा. साई मंदिरजवळ, परतवाडा), भंगार दुकानदार शेख इकबाल शेख युसूफ (४३, रा. अन्सारनगर, परतवाडा) यास अटक केली, तर दोघे फरार आहेत. पोलिस त्यांचा तपास घेत आहेत. त्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या या टोळक्यात तीन अल्पवयीन मुलांसह चौघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल नवगिरे, पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, ठाणेदार संदीप चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मनोज कदम, सचिन होले, रवींद्र बहुरीया, शफिक शेख, रमन हिवराळे, विवेक ठाकरे, सचिन कोकने, मंगेश साव, मंगेश पाटील, चालक सूरज तांडीलकर, अंकुश धोटे करत आहेत.
सीसीटीव्हीतून उघड झाला प्रकार
२५ नोव्हेंबर रोजी शहरातील आठवडी बाजार परिसरातून दुचाकी चोरीचे सीसीटीव्ही फुटेज गुन्हे प्रगटीकरण शाखेला प्राप्त झाले. त्याची बारकाईने पाहणी करण्यात आली असता, एक अल्पवयीन मुलगा पार्क केलेल्या ठिकाणाहून दुचाकी बाजूला नेऊन काही अंतरावर उभ्या दोघांच्या ताब्यात देत असल्याचे दिसत होते.
हत्तीघाटच्या जंगलात पुरून ठेवले सुटे भाग
आरोपींनी तपासादरम्यान दिलेल्या माहितीवरून हत्तीघाट येथील जंगलामध्ये आरोपींनी असंख्य दुचाकी चोरून त्याचे भाग वेगवेगळे करून जंगलातील खड्ड्यात पुरून ठेवले. त्यात क्रमांक खोडलेले तीन इंजिन, चार चेचीस, आठ इंजिनसह असणारे चेचीस, सात सायलेन्सर, सहा मडगार्ड, दहा शॉकअप, सात रिंग (टायरसह), एक पेट्रोल टाकी, एक ब्रेकपट्टी, दोन बॅटरी असा सुमारे ३ लाख १५ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.