देशात प्रथमच अमरावती विद्यापीठात सीबीसीएस; विद्या परिषदेचा ऐतिहासिक निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 11:49 AM2022-05-05T11:49:15+5:302022-05-05T11:52:27+5:30
विद्या परिषदेने सीबीसीएसला मान्यता दिल्यानंतर सर्व अभ्यास मंडळे आपापल्या विषयाचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम लवकरच तयार करणार आहेत.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव विज्ञान व आंतर विद्याशाखीय अभ्यास या चार विद्या शाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) लागू करण्याचा बुधवारी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या विद्या परिषदेच्या सभेत याविषयी शिक्कामोर्तब झाले. देशात ही पद्धत अभ्यासक्रमामध्ये लागू करणारे अमरावती विद्यापीठ प्रथम ठरले, हे विशेष.
शिक्षण, अध्यापन, परीक्षा व मूल्यांकन याबाबत हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आवश्यक असलेले निदेश, अध्यादेश व विनियम यांना सुध्दा विद्या परिषदेने मान्यता प्रदान केली असून विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालये व शैक्षणिक विभागांना सत्र २०२२-२०२३ पासून लागू होणार आहे. चारही विद्या शाखांनी याबाबत केलेल्या शिफारशी मान्य केल्या असून सीबीसीएस पद्धत लागू करताना काही अभ्यासक्रम वगळण्यात आले आहेत.
सीबीसीएस पद्धतीबाबत चारही अधिष्ठात्यांनी सविस्तर सादरीकरण विद्या परिषदेच्या सभेत केले. त्यावर चर्चा होऊन काही दुरूस्त्यांचा विचार करून ही पद्धती लागू करण्यात आली. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सेमिस्टर पद्धत लागू राहणार असून विद्यार्थ्यांना आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम त्यांना पूर्ण करता येणार असून त्याचे क्रेडिट मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थी रोजगारक्षम होईल.
अभ्यासमंडळे तयार करणार नवीन अभ्यासक्रम
विद्या परिषदेने सीबीसीएसला मान्यता दिल्यानंतर सर्व अभ्यास मंडळे आपापल्या विषयाचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम लवकरच तयार करणार आहेत. येत्या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. सीबीसीएसबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ३० जूनपर्यंत प्रत्येक पदवी अभ्यासक्रमांच्या दोन सेमिस्टरचे सिलॅबस तयार होणार आहे.
सीबीसीएस अभ्यासक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, त्याबाबत काही अडचणी असल्यास त्याचे निवारण होण्यासाठी आढावा समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश असणार असून त्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार आहे.
- डॉ. दिलीप मालखेडे, कुलगुरू, अमरावती विद्यापीठ.