लोकांनी धास्ती घेतलेला बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार, आता हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2022 10:53 PM2022-10-16T22:53:45+5:302022-10-16T22:54:54+5:30
‘लोकमत’ १६ ऑक्टोबर रोजी ‘शहराच्या सीमावर्ती नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचा धोका’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. मात्र, पहाटे सोडतीन वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने अंदाजे चार ते पाच वर्षे वय असलेला नर बिबट्या जागीच ठार झाला. आता मात्र बिबट्या गेल्यामुळे वन्यजीवप्रेमी, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील रहाटगाव-बडनेरा नवीन बायपासवर हॉटेल गौरी इनपासून ५०० मीटर अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याचा रविवारी, पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा, तसेच शवविच्छेदन करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
‘लोकमत’ १६ ऑक्टोबर रोजी ‘शहराच्या सीमावर्ती नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचा धोका’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. मात्र, पहाटे सोडतीन वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने अंदाजे चार ते पाच वर्षे वय असलेला नर बिबट्या जागीच ठार झाला. आता मात्र बिबट्या गेल्यामुळे वन्यजीवप्रेमी, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. पशुवैद्यकीय विभागाचे साहाय्यक आयुक्त आर. डब्ल्यू. खेरडे यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जे. मोहोड व डॉ. एस. आर. ठोसर यांनी शवविच्छेदन केले.
काही दिवसांपासून अमरावती शहराच्या सीमावर्ती भागात शिकारीच्या शोधात बिबट्या नागरी वस्तीकडे धाव घेत आहे. त्याच अनुषंगाने रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अर्जुननगरच्या मागील बाजूकडील भागातून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना बिबट्याला अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राण गमवावे लागले. सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, आरएफओ वर्षा हरणे, क्षेत्र सहायक एस.एम. देशमुख, वनरक्षक एस.डी. टिकले, पी.एस. खाडे, के. एन. इंगळे, ओंकार भुरे, राजू पिंजरकर, सी.बी. चोले, संदीप चौधरी, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर आदी उपस्थित होते.
शवविच्छेदनानंतर मृत बिबट्यास अग्नी देण्यात आला. वनसंरक्षक जी. के. अनारसे, उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली.
शिकारीसाठी नागरी वस्तीत धाव
काही दिवसांपासून बिबट श्वान, वराहाच्या शिकारीसाठी महादेव खोरी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था कठोरा मार्ग, विद्यापीठ परिसर नवसारी आदी भागात वारंवार आढळून आल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभाग आणि वन्यजीवप्रेमींनी संयुक्त गस्तदेखील सतत चालविली. मात्र, रविवारी पहाटे झालेल्या अपघातात बिबट्या ठार झाला.