४ जुलैला मोठी खगोलीय घटना घडणार; पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 06:26 PM2024-06-30T18:26:04+5:302024-06-30T18:26:20+5:30
खगोलीय घटना : या दिवशी राहणार १५२ दशलक्ष कि.मी.चे अंतर
अमरावती : खगोलशास्त्रानुसार ४ जुलै रोजी पृथ्वी व सूर्यामधील अंतर सर्वात जास्त राहणार आहे. याला ‘एपीहॅलिऑन’ म्हटले जाते. पृथ्वी व सूर्यामधील सरासरी अंतर १५ कोटी कि.मी. आहे. या अंतराला खगोलशास्त्रात एक खगोलीय एकक म्हटले जाते. या दिवशी हे अंतर १५२ दशलक्ष कि.मी. राहणार आहे. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.
सूर्य हा तप्त वाळूचा गोळा असून यामध्ये हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र सुरू असते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळतो. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलीयन बनतो. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तुमानाचे रूपांतर सौरऊर्जेमध्ये होते. सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी होते, त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असते. या डागांचा शोघ १८४३ मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला.
या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले. फेब्रुवारी २००८ पासून २४ वे चक्र सुरू झाले आहे. मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होतो. दर १ लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंमी ओढली जात आहे व पाच खंडदेखील हळूहळू सरकत असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे
१) सूर्याचे वय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर आर्थर एडिंग्टन आहे. त्यांच्यानुसार सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे आहे. त्यापैकी ५ अब्ज वर्षे संपली आहेत. आणखी ५ अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू श्वेत बटू ताऱ्यामध्ये होईल.
२) सूर्यावरून कधी कधी चुंबकीय लहरी फेकल्या जातात. त्यामुळे चुंबकीय वादळे येतात. १८५९ मध्ये असेच वादळ आले होते. त्यामुळे जगातील टेलीग्राफ यंत्रणा बंद पडली होती. या वादळाला ‘केरीटन इव्टेट’ हे नाव दिले आहे.