प्रियकराकडून ‘ती’ला मोबाईल गिफ्ट; मुलीने दिली आत्महत्येची धमकी

By प्रदीप भाकरे | Published: February 18, 2024 03:57 PM2024-02-18T15:57:12+5:302024-02-18T15:58:09+5:30

महिलेच्या अल्पवयीन मुलीची व आरोपीची एक वर्षापूर्वीपासून ओळख आहे. महिलेला माहिती झाल्याने तिने मुलीला त्याबाबत विचारणा केली.

A mobile gift to 'her' from a lover; The girl threatened suicide | प्रियकराकडून ‘ती’ला मोबाईल गिफ्ट; मुलीने दिली आत्महत्येची धमकी

प्रियकराकडून ‘ती’ला मोबाईल गिफ्ट; मुलीने दिली आत्महत्येची धमकी

अमरावती : आपल्या अल्पवयीन मुुलीला एका तरुणाने मोबाईल गिफ्ट दिल्याचे समजताच आईने तो घेण्याचा प्रयत्न केला असता मुलीने चक्क आत्महत्येची धमकी दिली. त्यामुळे महिलेने तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने समजून न घेता, ती १८ वर्षांची झाली की तिला पळवून नेणारच, अशी गर्भित धमकी दिली. त्यामुळे त्या महिलेची स्थिती ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाल्याने तिने अखेर पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी १७ फेब्रुवारी रोजी रात्री आरोपी तुषार राजू वानखडे (वय २३, रा. अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलीची व आरोपीची एक वर्षापूर्वीपासून ओळख आहे. त्याबाबत महिलेला माहिती झाल्याने तिने मुलीला त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी आरोपी हा आपला शाळेत ये-जा करताना पाठलाग करायचा, रस्त्यात थांबवून मैत्री कर, प्रेम कर असे म्हणायचा, असे मुलीने सांगितले. त्यावेळी तो संपूर्ण प्रकार बंद कर, असे महिलेने आपल्या मुलीला प्रेमाने समजावून सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने अल्पवयीन मुलीला मोबाईल दिला. त्यावर तो घरच्यांचे ऐकायचे नाही, माझ्याशी लग्न कर, असे मेसेज देखील करीत होता. ते मेसेज देखील महिलेने पाहिले.

जे होते ते करून घ्या!

दरम्यान, १ जानेवारी रोजी महिलेला आपल्या अल्पवयीन मुलीकडे ॲण्ड्रॉईड मोबाईल सापडला. तो मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला असता मुलीने चक्क आईलाच आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने आरोपी तुषार वानखडे याला फोन कॉल करून समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपीने तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, ती अठरा वर्षांची झाल्यानंतर मी तिला घेऊन जाणार, अशी गर्भित धमकी दिली. त्याने शिवीगाळ देखील केली.

फोटो व्हायरल करण्याची धमकी

आरोपी तुषार वानखडे याच्या अशा कृत्यामुळे मुलीची प्रकृती खालावली आहे. तिची अवस्था खराब झाली आहे. आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीला तिचे फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून पळून जाण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचेही महिलेने बडनेरा पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे. मुलगी आत्महत्येची धमकी देते, तर आरोपी तिला पळून नेण्याची धमकी देत असल्याने अखेर ती महिला पोलिस ठाण्याच्या पायऱ्या चढली.

Web Title: A mobile gift to 'her' from a lover; The girl threatened suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.