पावसाळ्याला महिनाभर उलटला, अद्यापही पाणीसाठा नाही वाढला
By जितेंद्र दखने | Published: July 10, 2024 05:39 PM2024-07-10T17:39:38+5:302024-07-10T17:40:19+5:30
Amravati : जिल्ह्यांतील ५६ प्रकल्पांत ३७ टक्केच जलसाठा
अमरावती : यावर्षी पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी वरुणराजाची म्हणावी तशी कृपा झालेली नाही. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील जलसाठ्यावरील संकट तसेच्या तसे आहेत. जिल्ह्यातील मोठ्या व ७ मध्यम, आणि ४८ लघु अशा ५६ प्रकल्पांमध्ये ७ जुलैअखेर केवळ ३७.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मागील वर्षाच्या पावसाळ्यात यावेळी बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. यावर्षी जून महिन्यातच पावसाला सुरुवात होईल. अशी अपेक्षा होती. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जूनमध्ये झालेल्या अगदी तुरळक पावसाने या धरणांमधील पाणी साठ्यात कोणतीच वाढ झालेली नाही. हा पाऊस सर्वत्र मुसळधार झाला तर पाण्याचा प्रश्न सुटेल अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मूळ परवडता धरणाचा साठा ४४.६५ टक्के आहे. जिल्ह्यात एक मोठा ७ मध्यम व ४८ लघु प्रकल्पांमध्ये एकूण जलसाठा १०४७.३० दलघमी असतो मात्र आजच्या घडीला केवळ ३८९.२५ टक्के दलघमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पामध्ये पाणीसाठा खूप कमी झाला आहे. यामध्ये २९.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे तसेच ४६ लघु प्रकल्पात २७.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जून महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्याने धरणांमध्ये नव्याने पाण्याची आवक झाली नाही.
प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प - पाणीसाठा टक्के
अप्पर वर्धा - २५१.८५ ४४.६५
शहानुर - १३.३३ २८.९५
चंद्रभागा- २१.९४ ५३.१८
सपन- १८.५९ ४८.१६
पूर्णा- १८.५१ ५२.३२
पंढरी- १०.२० १८.०९
बोर्डी नाला १.२२ १०.०७