आनंदाच्या क्षणांवर दुःखाचा डोंगर.. लग्नाच्या अवघ्या सात दिवसांनंतर नवविवाहितेची माहेरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 05:53 PM2022-07-21T17:53:51+5:302022-07-21T17:54:27+5:30
लग्नाची हळद सुकण्यापूर्वीच तिने जगाचा असा अकाली निरोप घेतला. त्यामुळे तिच्या आईवडिलांसह तिच्या पती व सासरच्या मंडळींना जबर धक्का बसला आहे.
अमरावती : पूर्वप्रियकराच्या जाचापोटी एका नवविवाहितेने विषाचा घोट घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना तिवसा तालुक्यात उघड झाली. या प्रकरणी मृत महिलेच्या पित्याच्या तक्रारीवरून आरोपी हृतिक सुभाषराव डहाके (२२, रा. निंभोरा देलवाडी) याच्याविरुद्ध कलम ३०६ व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ जुलै रोजी सायंकाळी नवविवाहितेने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. लग्नाची हळद सुकण्यापूर्वीच तिने जगाचा असा अकाली निरोप घेतला. त्यामुळे तिच्या आईवडिलांसह तिच्या पती व सासरच्या मंडळींना जबर धक्का बसला आहे.
मृत नवविवाहितेच्या आईच्या तक्रारीनुसार, आरोपी हृतिकचे ‘जया’ (काल्पनिक नाव) हिच्याशी प्रेमसंबंध होते. त्याने काही वर्षे तिच्याशी प्रेमालाप केला. तिच्या कुटुंबीयांनादेखील त्या प्रेमप्रकरणाची जाणीव होती. त्यामुळे उगाचाच सामाजिक बदनामी नको, तुम्ही परस्परांवर प्रेम करता, तर माझ्या मुलीशी लग्न कर, अशी सूचना वजा आर्जव तरुणीच्या आईने आरोपी हृतिककडे केले. मात्र, त्याने जातीचे कारण समोर करत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे १० जुलै रोजी ती तरुणी कुटुंबीयांनी ठरविलेल्या अन्य तरुणासोबत विवाहबद्ध झाली. सासरी गेली. मात्र तेथेदेखील आरोपीने तिची पाठ सोडली नाही. त्याने तिला मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले. त्या त्रासाला कंटाळून ती माहेरी परतली. लग्नानंतर अवघ्या सातव्या दिवशी १७ जुलै रोजी सायंकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास तिने माहेरीच विषारी द्रव्य प्राशन केले. तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्या धक्क्यातून कसेबसे सावरत तिच्या आईने २० जुलै रोजी तिवसा पोलीस ठाणे गाठले.
लग्नाच्या अवघ्या सात दिवसांनंतर त्या नवविवाहितेने माहेरी आत्महत्या केली. या प्रकरणी मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक झालेली नाही. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक करीत आहेत.
संदीप चव्हाण, ठाणेदार, तिवसा