शेतीसाहित्य चोरणारी चोरजोडी पोलिसांकडून ट्रॅप; दुचाकी, मोटर पंप जप्त
By प्रदीप भाकरे | Published: November 27, 2023 06:21 PM2023-11-27T18:21:52+5:302023-11-27T18:23:10+5:30
नांदगाव खंडेश्वर पोलिसांची कारवाई
अमरावती : शेती साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली. रामेश्वर लक्ष्मणराव खंडाते व विकास हरिदास मारब्दे (दोघेही रा. येरड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून शेतातील मोटर पंप जप्त करण्यात आला.
नांदगांव खंडेश्वर पोलीस पथक पेट्रोलिंग करित असतांना दोन इसम हे एका दुचाकीवर चांदुर रेल्वे-नांदगांव खंडेश्वर रोडने फिरत असून त्यांच्या जवळ शेतातील मोटरपंप आहे. ते विक्रीच्या उद्देशाने चौकशी करित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नाकाबंदी करून त्या दुचाकीस थांबविले असता दुचाकीवरील रामेश्वर खंडाते व विकास मारब्दे यांच्याकडे मोटर पंप मिळून आला. तो मोटर पंप आपण ऑक्टोबर महिन्यात नांदगाव येथील किशोर जैन यांच्या शेतातून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. ते त्या मोटरपंपची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून चोरीचे मोटारपंप व गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
आणखी काही घटनांचा उलगडा
अटक आरोपींकडून शेती साहित्य चोरीच्या आणखी काही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून पुढील तपास नांदगांव खंडेश्वर पोलीस करित आहेत. पोलीस अधिक्षक विशाल आंनद, अपर पोलीस अधिक्षक विक्रम साळी, उप-विभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनात नांदगावचे ठाणेदार विशाल पोळकर, पोलीस अंमलदार राजेश हिरेकर, सतिश राठोड, निखिल मेटे, प्रशांत पोकळे, राहुल गजभिये यांच्या पथकाने ही कारवाई केली.