परतवाड्यात घरफोडी करणाऱ्या जोडीला मध्यप्रदेशात केले जेरबंद
By प्रदीप भाकरे | Published: May 18, 2023 05:21 PM2023-05-18T17:21:48+5:302023-05-18T17:22:17+5:30
Amravati News परतवाडा येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने १८ मे रोजी ही कारवाई केली.
अमरावती : परतवाडा येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने १८ मे रोजी ही कारवाई केली. त्या घरफोड्यांकडून परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. त्यांच्याकडून ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीनुसार, दिपेंद्र संतोष हारोडे (२२) व रोशन उर्फ रोशू दीपक नागवत (२०, दोघेही रा. हमलापूर, मध्यप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णूनगर येथील रहिवासी श्रीकृष्ण मधुकर शेकोकार हे कुटुंबासह लग्नानिमित्त बाहेरगावी गेल्यावर त्यांचे घर फोडून ५४ ग्रॅम सोने, १८ ग्रॅम चांदिचे दागिने व रोख १ हजार ६०० रुपये लंपास करण्यात आले होते. तसेच त्यांच्या शेजारील दोन घरे फोडून ८ ग्रॅम सोने, ४ ग्रॅम चांदिचे दागिने व रोख ३ हजार रुपये असा एकूण २ लाख २९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लांबविण्यात आला होता. या प्रकरणी श्रीकृष्ण शेकोकार यांनी ७ मे रोजी परतवाडा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला.
आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली स्थानिक गुन्हे शाखाही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होती. तपासात त्या गुन्ह्यात मध्यप्रदेशमधील हमलापूर येथील दिपेंद्र हारोडे व रोशन नागवत यांचा हाथ असल्याचे समोर आले. त्यानुसार या दोघांना मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून ६२ ग्रॅम सोने, २२ ग्रॅम चांदी, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व अन्य साहित्य असा एकूण ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपी सराईत
दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मध्यप्रदेश व महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, संतोष मुंदाने, त्र्यंबक मनोहर, युवराज मानमोठे, रवींद्र वऱ्हाडे, सय्यद अजमत, अमोल केंद्रे, सागर नाठे, प्रमोद शिरसाट, हर्षद घुसे यांनी केली.