अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
By प्रदीप भाकरे | Published: February 23, 2024 05:40 PM2024-02-23T17:40:46+5:302024-02-23T17:41:44+5:30
शिंगणापूर येथील चौफुलीवर औरंगाबादकडून रसायन घेऊन जाणाऱ्या टॅंकरने तरूण मुलांच्या ट्रॅव्हलरला मधोमध धडक दिली होती.
अमरावती: यवतमाळला क्रिकेट खेळण्यासाठी जात असलेल्या २३ तरूण मुलांच्या वाहनाला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर येथे प्राणांतिक अपघात झाला होता. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास झालेल्या त्या अपघातात चार तरूणांचा मृत्यू झाला होता. आपल्या जीवाची पर्वा न करता काही ग्रामस्थांनी त्यातील जखमींना बाहेर काढून तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली. त्यांच्या त्या समयसुचकतीमुळे व सामाजिक बांधिलकीच्या बाण्यामुळे अनेक तरूणांचे प्राण वाचले. त्या देवदुतांच्या पाठीवर पोलीस अधीक्षकांनी कौतुकाची थाप दिली. शुक्रवारी एसपी कार्यालयात त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिंगणापूर येथील चौफुलीवर औरंगाबादकडून रसायन घेऊन जाणाऱ्या टॅंकरने तरूण मुलांच्या ट्रॅव्हलरला मधोमध धडक दिली होती. त्यातील चार तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर १९ तरूण, टेम्पो ट्रॅव्हलरचालक जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच उमेश तळेकार, संजय साबदे (दोघेही रा.पाचोड), प्रशांत देशमुख (रा.शिंगणापूर),ओंकारेश्वर दरेकर (रा. शिवणी), ऋषीकेश चोपडे (रा. कोठोडा), गजानन सानप (रा. शिवर), मोरेश्वर पडळीकर, माधव पुनसे व आसिफ शहा (तिघेही रा. मंगरूळ चव्हाळा) व सुरज चोपकर (रा. शिवनी) यांनी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना त्वरित उपचारार्थ रुग्णालयात दाखल करुन त्यांचे प्राण वाचविण्याची मोलाची कामगिरी केली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्या नागरिकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा उचित सत्कार व्हावा, म्हणून त्यांना २३ फेब्रुवारी रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात बोलावले. येथे त्यांना एसपी आनंद व अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले.
नागरिकांनी अपघाताच्या किंवा इतर गुन्हयावेळी पिडीतांना सदबुध्दीने मदत केल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणून अपघातातील, गुन्हयातील पिडितांना त्वरित मदत देण्यास नागरिकांनी समोर यावे. त्या बांधिलकीमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.
विशाल आनंद, पोलीस अधीक्षक