अन् घरी पोहोचण्याआधीच 'त्या' चिमुकल्यावर काळाने घातली झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 02:14 PM2022-11-16T14:14:33+5:302022-11-16T14:17:58+5:30

अचलपूर-रासेगाव मार्गावरील घटना, वाहनात अवैध तांदूळ?

a pickup crushed 7 year old boy who got off the bullock cart and headed home | अन् घरी पोहोचण्याआधीच 'त्या' चिमुकल्यावर काळाने घातली झडप

अन् घरी पोहोचण्याआधीच 'त्या' चिमुकल्यावर काळाने घातली झडप

googlenewsNext

परतवाडा (अमरावती) : वडील शेतात बैलगाडी घेऊन निघाले. मागे सहा वर्षांचा सोहम बसला. काही अंतरापर्यंत त्याच्या प्रवासाचा हा डाव, नंतर तो घरी, तर वडील शेतात जाणार होते. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते, चिमुकला बैलगांडीतून उतरून घराकडे जायला निघाला आणि काळाने झडप घातली, यमदूत म्हणून आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्याला रस्त्यावरच चिरडून ठार केले.

बापासमोर पोटच्या गोळ्याचा क्षणात जीव गेला, रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून असलेल्या चिमुकल्याला उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जिवाचा थरकाप उडणारी ही घटना सरमसपुरा पोलीस स्टेशनांतर्गत असलेल्या अचलपूर-रासेगाव मार्गावर मंगळवारी सकाळी ८ वाजता घडली. सोहम सुधीर चौखंडे (वय ७,अब्बासपुरा, अचलपूर) मृताचे नाव आहे.

अकोटवरून आलेल्या चार चाकी पीकअप (एम एच ३० बीडी ४७०३) या वाहनाने त्याला चिरडले सरमसपुरा पोलिसांनी फिर्यादी अंकित राजेंद्र चौखंडे (२५, रा. अब्बासपुरा) यांच्या तक्रारीवरून भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात करणाऱ्या आरोपी चालक वैभव नाजूकराव नांदूरकर (२५, हनुमाननगर, आकोट) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९,३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुलभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहेत.

वाहनात तांदूळ धान्याची तस्करी?

सदर चारचाकी वाहनात अकोट व परिसरातून तांदूळ गोंदियाकडे जात असल्याची प्राथमिक माहिती असली तरी हे तांदूळ परतवाडा शहरातील एका तस्कराकडे येत असल्याची ‘लोकमत’ला सूत्राने माहिती दिली. त्यासंदर्भात पोलिस आणि महसूल विभागाने संयुक्त चौकशी केल्यास तस्करांचे धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: a pickup crushed 7 year old boy who got off the bullock cart and headed home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.