बिअर पिताना हटकल्यामुळे पोलिसाचा शर्ट फाडला; तिघांना २ वर्षे सक्तमजुरी
By प्रदीप भाकरे | Published: July 18, 2023 01:38 PM2023-07-18T13:38:33+5:302023-07-18T13:40:47+5:30
२०१४ मधील घटना : शिक्षाप्राप्त आरोपींमध्ये बापलेक
अमरावती : राजापेठ पोलिस ठाण्यात कार्यरत हेडकॉन्स्टेबलचा शर्ट फाडून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी तीन आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरी व एकूण १५ हजार रुपये दंड ठोठावला. जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. ताम्हाणेकर यांनी १७ जुलै रोजी हा निर्णय दिला. ही घटना २५ मे २०१४ रोजी राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे फाटकाजवळ घडली होती.
रोहित दिलीप वैद्य, दिलीप चंद्रकांत वैद्य व राहुल दिलीप वैद्य (तिघेही रा. मुधोळकर पेठ) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दोषारोपपत्रानुसार, तीनही आरोपी राजापेठ रेल्वे फाटकाजवळील एका शॉपीसमोर रस्त्यावर बिअर पित होते. गस्तीवर असलेल्या हेडकॉन्स्टेबल संजय धावडे व अमर तराळे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी त्या तिघांना हटकले. यावेळी त्या तिघांनी संजय धावडे यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्यावर बिअरच्या बाटल्या फेकल्या. त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी संजय धावडे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात ७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तीनही आरोपींना २ वर्षे सश्रम कारावास, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील सुनीत ज्ञानेश्वर घोडेस्वार यांनी यशस्वी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून बाबाराव मेश्राम व अरुण हटवार यांनी काम पाहिले.