मेळघाटात रुग्णवाहिकेअभावी बाळासह गर्भवती माता दगावली!

By उज्वल भालेकर | Published: September 1, 2024 07:37 PM2024-09-01T19:37:07+5:302024-09-01T19:37:15+5:30

दहेंद्री येथील घटना, आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर

A pregnant mother with her baby died due to lack of ambulance in Melghat! | मेळघाटात रुग्णवाहिकेअभावी बाळासह गर्भवती माता दगावली!

मेळघाटात रुग्णवाहिकेअभावी बाळासह गर्भवती माता दगावली!

अमरावती: बाल आणि मातामृत्यूच्या घटनेमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मेळघाटच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दहेंद्री या गावातील एका गर्भवती महिलेला वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तिची घरीच प्रसूती झाली. यामध्ये तिच्या बाळाचा मृत्यू झाला. तर प्रसूतीमध्ये प्रकृती बिघडलेल्या ‘त्या’ २० वर्षीय मातेचादेखील इर्विनच्या आयसीयू विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने मेळघाटातील आरोग्याच्या सुविधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

मेळघाटातील आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर आहे. आजही येथील दुर्गम भागातील रहिवासी नागरिकांना उपचार सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आजही कायम आहे. चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री या गावातील रहिवासी कविता अनिल साकोम (२०) ही गर्भवती महिलेला शनिवारी सकाळपासून प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. यावेळी या महिलेच्या नातेवाइकांनी याची माहिती देत रुग्णवाहिकेची मागणी आरोग्य विभागाला केली होती. परंतु रुग्णवाहिका येण्यास तीन ते चार तासांचा वेळ लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. अखेर या महिलेची घरीच प्रसूती झाली. परंतु यामध्ये तिचे बाळ मृत जन्माला आले.

या प्रसूतीनंतर कविताची प्रकृती बिघडत असल्याने तिला लगेच खासगी वाहनाने चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तिची प्रकृती जास्तच बिघडत असल्याने तिला तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. परंतु कविता उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे पाहून येथूनही तिला जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे रेफर करण्यात आले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास कविताला घेऊन तिचे नातेवाईक इर्विनमध्ये आले. येथे तिला तपासणी करून वेळीच आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. परंतु रविवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान कविताचा मृत्यू झाला. प्रसूतीच्या वेळीच रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली असती तर कविता आणि तिचे बाळही वाचले असते असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

पत्नीला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिकेसाठी कॉल केला होता. परंतु रुग्णवाहिका मिळाली नाही, त्यामुळे घरीच प्रसूती झाली. त्यानंतर पत्नीलाही न्यायला रुग्णवाहिका मिळाली नसल्याने खासगी वाहनाने तिला चुरणी येथे नेले होते. परंतु तेथून अचलपूर नंतर अमरावती रेफर करण्यास सांगितले. जर वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर कदाचित माझी पत्नी आणि बाळाचाही जीव वाचले असते.- अनिल साकोम, मृत कविताचा पती

Web Title: A pregnant mother with her baby died due to lack of ambulance in Melghat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.