चौदा कोटींचा प्रीमियम अन् चार कोटींचाच परतावा
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: January 19, 2024 08:09 PM2024-01-19T20:09:37+5:302024-01-19T20:09:46+5:30
आंबिया बहरचा फळपीक विमा; संत्रा, मोसंबी, केळी उत्पादक चिंतेत
अमरावती: आंबिया बहरासाठी गतवर्षीच्या हंगामात उत्पादक व शासनाचा असा एकूण १४.१८ कोटींचा प्रीमियम फळपीक विमा कंपनीकडे जमा झालेला आहे. प्रत्यक्षात फळबागांचे नुकसान झालेले असताना कंपनीद्वारा आतापर्यंत १४१४ शेतकऱ्यांना ४.२५ कोटींचा परतावा देण्यात आलेला आहे. कंपनी फळपीक विमा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
सन २०२२-२३ मधील आंबिया बहरसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत ३५१७ शेतकऱ्यांनी फळपिकाचा विमा काढला होता. यासाठी चार कोटींचा शेतकरी हिस्सा व साधारण १० कोटींचा राज्य व केंद्र शासनाचा हिस्सा असा एकूण १४.१८ कोटींचा प्रीमियम पीक विमा कंपनीकडे यापूर्वीच जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे फळपिकांच्या नुकसानीसाठी कंपनीद्वारा परतावा मिळण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे. दुसरीकडे तांत्रिक कारणांचा आधार घेत कंपनी परताव्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.