खासगी बसची व्याघ्र प्रकल्पाच्या वाहनाला धडक; आरएफओ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 11:03 AM2023-03-24T11:03:12+5:302023-03-24T11:04:13+5:30
पुलाजवळच अपघात, नशिबाने बचावले प्रवासी
चिखलदरा (अमरावती) : परतवाडा-इंदूर मार्गावरील पिलीनजीक खासगी बस व वनविभागाच्या वाहनात गुरुवारी दुपारी १ वाजता अपघात झाला. त्यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी जखमी झाले. त्यांच्यावर परतवाडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मार्गावरील पुलाजवळच हा अपघात झाला. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.
धारणीकडून येणारी खासगी ट्रॅव्हल्स (एमएच- २७, ए- ९६३९) व विरुद्ध दिशेने आलेले व्याघ्र प्रकल्पाचे शासकीय वाहन (एमएच- ३१, एफसी- २४९४) यांच्यात हा अपघात झाला. खासगी बसने शासकीय वाहनाला धडक दिली. धडक जोराची असल्याने शासकीय वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये बसलेले वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र युवनाते हे जखमी झाले. त्यांच्यावर सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून परतवाडा येथे पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होत आहेत. यासंदर्भात शासकीय वाहनाचे चालक मिठाराम कोल्हे (रा. कांडली) यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी खासगी बसचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे.
अनर्थ टळला, प्रवासी बचावले
पिली गावानजीक अपघातस्थळाच्या ठिकाणी मार्गावर पूल आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने नियंत्रित झाल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा प्रवासी बस किंवा शासकीय वाहन पुलाखाली फेकले गेले असते.