'शिवशाही'पेक्षा लाल डबा परवडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 03:54 PM2024-05-27T15:54:06+5:302024-05-27T15:55:57+5:30
Amravati : पडदे घाणेरडे, सीसीटीव्ही, चार्जर बंद; प्रवाशांना मिळेनात सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : किफायतशीर दरात दर्जेदार प्रवास सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही बस आणल्या होत्या. मात्र, अल्पावधीतच या शिवशाही बस भंगार झाल्या आहेत. अमरावती विभागात महामंडळामार्फत ३९ शिवशाही बस प्रवासी सेवेत चालविल्या जातात. यापैकी अनेक बसची अवस्था दयनीय आहे. बरेचदा शिवशाही बस प्रवासe दरम्यान वाटेतच बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवशाही बसमध्ये सुरुवातीला प्रवाशांकरिता असलेल्या सोयीसुविधांचा पार बोजवारा उडाला आहे. बऱ्याच बसची अवस्था भंगार झाली आहे. शिवशाही बसेसमधील पडदे घाणेरडे झाले आहेत. याशिवाय सीसीटीव्ही, चार्जरची सुविधा अल्पावधीतच बंद पडलेली आहे. वारंवार बसमध्ये तांत्रिक बिघाडाचे प्रकारही वाढल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
सीसीटीव्ही चार्जर बंद
शिवशाही बसेस ज्यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या तेव्हा या बसेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाइल चार्जिंगसाठी चार्जर स्वीच बसविले होते. मात्र, अल्पावधीत सीसीटीव्ही व चार्जर बंद पडले आहे. अशातच आता तर शिवशाही बसमध्ये या सोई सुविधा दिसेनाशा झाल्या आहेत.
खुर्थ्यांची स्थिती वाईट
शिवशाही बसेसमध्ये प्रवाशांकरिता टू बाय टू अशी आसन व्यवस्था आहे. मात्र सध्याच्या अमरावती विभागातील बहूतांश शिवशाही बसेसमधील खुच्र्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून सुरुवातीला या बसेसमध्ये प्रवाशांना मिळणारा आरामदायी प्रवास दुर्लभ झाला आहे. खुर्थ्यांची काही बसेसमध्ये फाटलेल्या आहेत.
एसीमध्ये कोंबलेले कागद
उन्हाळयाच्या दिवसांत अतिशय थंड वातावरणात प्रवाशांना प्रवास करायचा झाला तर बहुतांश प्रवासी हे शिवशाही बसेसला प्राधान्य द्यायचे. या बसेसमध्ये एसीची सुविधा होती. आता मात्र अनेक बसेसमधील एसी बंद पडले आहेत. तर काही एसीमध्ये कागद कोंबले असल्याचे चित्र दिसून आले.
प्रवासी म्हणतात...
शिवशाही बसेदमध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या होत्या, मात्र आता शिवशाही बसची अवस्था भंगार बससारखी झाली आहे.
- रवींद्र बागडे, प्रवासी
शिवशाही बस आवडीने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पसंती देत होतो. या बस प्रवासी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, मोबाइल चार्जर, एसी यांसारख्या सुविधा मिळत होत्या, मात्र आता यापैकी एकही सुविधा मिळत नाही.
- अभिषेक कावरे, प्रवासी
शिवशाही बसमध्ये प्रवाशांच्या सोईसाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यापैकी काही सुविधा बंद असल्या, तरी त्या दुरुस्ती केल्या जातात. शिवाशाही बस नियमित स्वच्छता व देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महामंडळ नेहमीच प्रयन्नशील असते.
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक