‘प्रहार’ची वेगळी चूल, आनंदराव अडसूळ निवडणूक लढविण्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 10:55 PM2024-03-24T22:55:01+5:302024-03-24T22:56:22+5:30
अमरावतीत भाजपचा उमेदवार वेटिंगवर; महायुतीत ‘ऑलवेल’ नाहीच
गणेश वासनिक
अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी अमरावती लोकसभा मतदार संघ हा भाजपच लढविणार, असे जाहीर केले आहे. मात्र, उमेदवार कोण? याबाबत पत्ते ओपन केले नाही. तर दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारचे बच्चू कडू आणि शिंदे सेनेेचे आनंदराव अडसूळ यांनी वेगळी भूमिका घेण्याची तयारी चालविल्याने महायुतीत ‘ऑलवेल’ नाही असे दिसून येते.
काँग्रेसने आमदार बळवंत वानखडे यांची अमरावतीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. वानखडे यांनी भेटीगाठी सुरू केल्या असताना भाजप अथवा महायुतीकडून उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले नाही. शिंदे सेेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावती मतदार संघ हा शिवसेनेचा असून तो आम्ही मागणार आणि लढविणार अशी भूमिका घेतली आहे. तर प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी महायुतीत आम्हाला विचारले जात नसेत तर वेगळी चूल मांडू असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एवढेच नव्हे तर ३ एप्रिल रोजी प्रहार उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. महायुतीत अमरावती लोकसभा जागेचा वाद संपुष्टात आला नाही. आता अमरावतीत उमेदवारी कोणाला याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असून त्यांच्या कोर्टात हे प्रकरण गेल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राणा दाम्पत्यांनी भाजपची उमेदवारी मिळणार याविषयी ते ठाम असून प्रचारदेखील सुरू केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी गत पाच वर्षांपासून भाजपचेच काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. असे असले तरी अमरावतीची जागा कोणाच्या वाट्याला आणि उमेदवार कोण? हे येत्या आठवड्यात स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांचा फोन
आमदार बच्चू कडू यांना २६ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी अमरावती लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईला बोलावले, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांच्या चर्चेनंतर बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आली तर पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करू, असे आमदार कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा करायला हरकत नाही पण अपमान कोणी सहन करणार नाही, अशी भूमिका त्यांची आहे. राणा विरोधात कार्यकर्त्यांची नाराजी आहे. राणांचा प्रचार केला तर प्रहारमधून बाहेर पडू असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, असेही आमदार कडू म्हणाले.