Amravati-Akola Highway : विश्वविक्रमी राष्ट्रीय महामार्ग काळजाचा ठोका वाढविणारा; समांतर रस्त्यामुळे अपघाताची मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 03:55 PM2022-06-13T15:55:10+5:302022-06-13T16:03:19+5:30
Amravati-Akola Highway : विक्रम झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपण केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा दर्जा कसा आहे हे मागे वळून पाहण्यास थोडीही फुरसत मिळू नये, यावर वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले.
बडनेरा (अमरावती) : अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते काटेपूर्णा हा विश्वविक्रमी रस्ता काळजाचा ठोका वाढविणारा ठरतो आहे. पूल अथवा धोकादायक वळणावर दिशा दर्शविणाऱ्या फलकांचा पत्ता नसल्याने वाहनचालकांची गोंधळाची स्थिती झाली आहे. कुठून कसे जावे, हे कळेनासे झाले आहे. त्यातच या मार्गावर अपघाताची मालिका सुरू असून, ती कधी खंडित हाेणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर नुकताच राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ७५ किलोमीटरचा रस्ता पाच दिवसांत तयार करण्याचा तथाकथित विश्वविक्रम नोंदविला. हा विक्रम केवळ स्वतःची पाठ थोपटून घेणारा असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांमध्ये आहेत. विक्रम झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपण केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा दर्जा कसा आहे हे मागे वळून पाहण्यास थोडीही फुरसत मिळू नये, यावर वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले. एकाच लेनवरून वाहनांची दुतर्फा वाहतूक सुरू आहे. मार्गावरील नाला तसेच वळणाच्या ठिकाणी दिशा दर्शविणारे फलक नसल्याने कुठून कसे जावे, अशी गोंधळाची स्थिती विश्वविक्रमी मार्गावर वाहनचालकांची झाली आहे.
बऱ्याच ठिकाणी रस्त्याची समानता नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन पुढे जावे लागते. दिसायला चकाचक, मात्र तेवढाच धोकादायक रस्ता वाहनचालकांच्या काळजाचा ठोका चुकविणारा आहे. या रस्त्याला खरंच विश्वविक्रमी रस्ता म्हणावा का, असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. गेल्या दहा वर्षांपासून जी भीती या मार्गावर होती, ती कायमच आहे. या रस्त्याचे बरेच काम अद्यापही बाकी आहे. रस्त्यावर वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी कुठलेही नियोजन असल्याचे दिसून येत नाही.
अद्यापही शेकडो धोकादायक पॉइंट
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी झपाट्याने उभारण्यात आलेल्या अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर शेकडो धोकादायक पॉइंट्स तयार झाले आहेत. विश्वविक्रम करण्याच्या धुंदीत मात्र कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाच दिवस उलटूनदेखील या धोकादायक पॉइंट्सकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळालेला नाही. हा मार्ग प्रचंड वर्दळीचा आहे. रात्रंदिवस यावर हजारो वाहने धावत असतात. चकाचक रस्ता तर बनला. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला एकसमानता नसल्याने रात्रीच्या वेळेस वाहनांसाठी धोकादायक झाले आहे.
कुरूमनजीक पुलाला नाहीत कठडे
मार्गावरून नियमित अमरावती-अकोला दुचाकीने कामकाजासाठी ये- जा करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. तथापि, कुरूमनजीक एका पुलाला कठडे नाहीत. अजून बरीच कामे बाकी आहेत. पावसाच्या पाण्याने रस्त्यालगतचा मुरूम वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरणार आहे.
उद्योगांची लागली वाट
दहा वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्यामुळे या मार्गावरील उद्योगधंद्यांची पार वाट लागली आहे. पेट्रोलपंप चालक, हॉटेल्स, ढाबे, पंक्चर दुकाने, छोटे-मोठे उद्योग करणारे प्रचंड त्रस्त आहेत. त्यांची आर्थिक घडी या रखडलेल्या महामार्गाने विस्कटली आहे.
अपघाताची मालिका कधी थांबणार?
अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावर राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लोणी ते नागठाणा या दरम्यान ७५ किमी. रस्ते निर्मितीचा स्वयंघोषित विक्रम नोंदविला असला तरी समांतर रस्त्यांमुळे अपघात होत आहे. शुक्रवारी (दि. १०) रोजी रात्री ११ च्या सुमारास गुजरातकडे गट्टू घेऊन जाणारा ट्रक उलटला. कुरूम गावाच्या पुढे काही अंतरावर हा अपघात झाला. सुदैवाने यात चालक, क्लीनर बचावले. मात्र, ट्रकसह इतर मोठे आर्थिक नुकसान झाले.