माणुसकीला काळिमा फासणारी घटना; जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय आदिवासी महिलेची धिंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:14 IST2025-01-18T12:12:13+5:302025-01-18T12:14:09+5:30
Amravati : मेळघाटच्या रेट्याखेडा येथील प्रकार; मूत्र पाजले, गरम सळाखीचे चटके, मारहाण

A shocking incident; 77-year-old tribal woman lynched on suspicion of witchcraft
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा (अमरावती) : ती ७७ वर्षीय आदिवासी वृद्धा नेहमीप्रमाणे पहाटे ४:०० वाजता शौचास घराबाहेर पडली. तत्क्षणीच, अंधारात दबा धरून बसलेल्या या वृद्धेवर शेजाऱ्यांनी जादूटोण्याचा आळ घेत तिला दोरखंडाने बांधले, मारलेही. त्यांनी तिला गरम सळाखीचे चटके, मिरचीची धुरी दिली. तोंडाला काळे फासले. बळजबरीने माणसाचे आणि कुत्र्याचे मूत्र पाजले. एवढ्यावरच हा अघोरी प्रकार थांबला नाही, तर त्या वृद्धेच्या डोक्यावर गाठोडे देऊन मारत धिंड काढून तिला गावातून बेदखल केले. दस्तुरखुद्द पोलिस पाटीलच यामध्ये सहभागी झाला होता. समाजमन सुन्न करणारा व पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारा हा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्याच्या रेट्याखेडा येथे ३० डिसेंबर रोजी घडला. मात्र, तो १७ जानेवारीला उघडकीस आला.
अमरावतीमध्ये एका कुटुंबावर जातपंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच संत गाडगेबाबांच्या, राष्ट्रसंतांच्या पावन भूमीत हा लज्जास्पद प्रकार घडला. मात्र, अद्याप याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला नाही. शुक्रवारी पीडित महिलेने कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालय गाठल्याने तिच्यावरील अघोरी अत्याचाराला वाचा फुटली. पीडितेसह शेलूकर कुटुंबाने न्यायाच्या मागणीसाठी शुक्रवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पोलिसांत तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने राज्याचा महिला आयोग, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक व धारणी उपविभागीय अधिकारी यांना या तक्रारीची प्रत पाठविण्यात आली.
शुक्रवारी गाठले अमरावती
- काळमी नंदराम शेलूकर (७७, रा. रेट्याखेडा) असे पीडिताचे नाव आहे. ३० डिसेंबर २०२४ रोजी या आदिवासी वृद्धेसोबत हा अघोरी प्रकार घडल्याची तक्रार मुलगा राजकुमार नंदराम शेलूकर व सून शामू राजकुमार शेलूकर यांनी केली.
- पोलिस पाटील बाबू झापू 3 जामूनकर यांच्यासह सायबू चतुर, २ त्याची पत्नी, साबूलाल चतुर, रामजी चतुर व इतर काही गावकऱ्यांवर या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी महिला आयुक्त, जिल्हा प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत या दाम्पत्याने केली आहे.
... असा घडला घटनाक्रम
- काळमी सेलूकर ही वृद्धा रेट्याखेडा येथे घरात एकटीच होती. मुलगा राजकुमार व सून शामू हे बाहेरगावी कामावर असतात, तर त्यांची दोन मुले शिक्षणाकरिता वसतिगृहात राहतात.
- ३० डिसेंबर रोजी काळमी पहाटे ४:०० वाजता शौचास जाण्यासाठी निघाली होती. शेजारी राहणाऱ्या सायबू चतुर व त्याच्या पत्नीने तिला पाहताच पकडून ठेवले व पोलिस पाटील बाबू जामूनकर याला बोलावले.
- आमच्या घराच्या बाजूला जादूटोणा करीत असल्याचा आरोप त्यांनी काळमीवर केला. बाबू जामूनकर याने काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायबू चतुर, साबूलाल चतुर, रामजी चतुर व इतरही ग्रामस्थांनी लाथाबुक्क्यांनी, हाताने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
"महिला व तिचे कुटुंबीय शुक्रवारी माझ्याकडे आले. प्रकरण अतिशय गंभीर आहे. पोलिस तपास सुरू असला तरी, माझ्याकडील तक्रारीत नमूद मुद्द्यांची, आरोपांच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली जाईल. धिंड काढल्याचा व अन्य अघोरी प्रकार उघड झाल्यास योग्य निर्देश देऊ. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वयेही कलमवाढ केली जाऊ शकते."
- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी