अपघातात ठार झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2023 09:08 PM2023-07-08T21:08:46+5:302023-07-08T21:09:50+5:30
Amravati News सुटी घालवून कर्तव्यावर परत जात असताना करजगाव (ता. चांदूर बाजार) येथील सैन्यातील जवानाच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने जबर धडक दिली होती. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमरावती : सुटी घालवून कर्तव्यावर परत जात असताना करजगाव (ता. चांदूर बाजार) येथील सैन्यातील जवानाच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने जबर धडक दिली होती. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रदीप सुखदेवराव बांबळकर (४१, रा. करजगाव) असे अपघातात दगावलेल्या सैनिकाचे नाव आहे. निवृत्तीला सहा महिने शिल्लक असल्याने एक महिन्याची सुटी घेऊन त्यांनी पेंशनकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली होती. ही कामे आटोपून व नात्यातील लग्न सोहळा पार पाडल्यानंतर सुटी संपण्याआधी त्यांनी करजगाव येथून पत्नी व दोन्ही मुलांना ऑटोरिक्षात परतवाड्याला जाण्यासाठी बसविले. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी दुचाकीने ते निघाले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या (जीजे ०३ एफडी ९६८२) क्रमांकाच्या भरधाव चारचाकीने एका बाजूला येत दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चारचाकीचा चालक प्रमोद शंकर धुर्वे (रा. पांडोडी, ता. भैसदेही, जि. बैतूल) याच्यासह एक प्रवासी जखमी झाला.
प्रदीप बांबळकर यांची अंत्ययात्रा शनिवारी संपूर्ण गावातून निघाली. हजारो नागरिकांनी हजेरी लावली. ‘अमर रहे’च्या घोषणांनी गाव निनादले. शासकीय इतमामात अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. २४ मराठा बटालियनचे सुभेदार, जवान, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र सचिव धीरजराजे सातपुते, बहादूर माजी सैनिकचे ज्ञानेश्वर भुजबळ, सुभेदार हरिहर भातकुले, कॅप्टन भास्कर काडोडे, श्याम अकोलकर, नीलेश रांगोळे, रामेश्वर ढाकुलकर, श्रीहरी बागडे, रावसाहेब दातीर, सुभेदार नरहरी भिडकर, ठाणेदार प्रशांत गीते, उपनिरीक्षक अमोल मानतकर, तसेच जिल्हा सैनिक कार्यालयाचे कर्मचारी यांनी मानवंदना दिली.