अवलिया शिक्षकाच्या प्रयत्नांना यश; सालनापूर येथील पोषण आहाराची 'युनिसेफ'ने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2022 11:13 AM2022-09-05T11:13:42+5:302022-09-05T11:25:25+5:30

शिक्षक दिन विशेष : २०० लोकवस्तीच्या गावातील जिल्हा परिषद शाळेचा गाैरव

a teachers efforts and UNICEF took note of the nutritional diet in Salnapur; felicitation ​​of Zilla Parishad School Salnapur | अवलिया शिक्षकाच्या प्रयत्नांना यश; सालनापूर येथील पोषण आहाराची 'युनिसेफ'ने घेतली दखल

अवलिया शिक्षकाच्या प्रयत्नांना यश; सालनापूर येथील पोषण आहाराची 'युनिसेफ'ने घेतली दखल

Next

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे (अमरावती) : प्रत्येक भिंतीवर विद्यार्थ्यांच्या नावाने सुविचार, कोट, सूट बूट परिधान करून कॉर्पोरेट जगतासारखा दररोज विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश, जगाच्या पाठीवर दैनंदिन घडणाऱ्या प्रत्येक बाबीची माहिती एवढेच नव्हे तर परिसरातील असलेल्या परसबागेतून वर्षभर सर्वंकष पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्याचे काम एका जिद्दी व अवलिया शिक्षकाने देऊन शाळेचे रूपडे बदलविले. अखेर युनिसेफने या बाबीची दखल घेत सर्वोत्कृष्ट शाळेचा बहुमान दिला.

तालुक्यातील दोनशे लोकवस्तीचे गाव सालनापूर. येथील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक मराठी शाळा. ज्ञानरचनावादी, परसबाग, कृतियुक्त शिक्षण, मुलांची गुणवत्ता, पालकांचा सहभाग, सकस आहार-सुदृढ बालक अशा एकापेक्षा एका उपक्रमांनी येथील शिक्षक विनोद राठोड यांच्या पराकाष्ठेने ही शाळा राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली आहे.

मेळघाटातील आलाडोह येथून सन २०१७ मध्ये विनोद राठोड यांची बदली सालनापूर येथे झाली आणि रात्रीला गुरे बसणाऱ्या या शाळेचे रूपडे पूर्णतः बदलले. मुलांची गुणवत्ता शंभर टक्के वाढवण्यासाठी ज्ञानरचनावादी उपक्रम राठोड यांनी राबविला. परसबाग निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात पालेभाज्यांचा समावेश झाला आहे. पुस्तकात वाचल्या जाणाऱ्या फुलांची लागवड करून प्रत्यक्षात मुलांना त्यावर आधारित माहिती दिली जाते.

सुटाबुटातील शाळा

जिल्हा परिषदेची शाळा असली तरी काॅर्पोरेट जगतासारखे येथील विद्यार्थी राहतात. अंगात सूट बूट दिला, आता इतर मुलांप्रमाणे हुशारीही असली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त झाली. त्यावर कार्य झाले. त्यामुळे जगात दैनंदिन घडणाऱ्या प्रत्येक बाबीची माहिती येथील विद्यार्थ्यांना आहे. संगणक ज्ञानातही येथील विद्यार्थी पारंगत झाले आहेत.

शाळाबाह्य मुलांना आधार

दिवाळी असो की दसरा, प्रत्येक सण विद्यार्थ्यांसोबत शाळेत साजरा करायचा आणि रविवारसह सुटीच्या दिवशी शाळाबाह्य मुले शोधायची आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे, या उपक्रमात ४० शाळाबाह्य मुलांना विनोद राठोड यांनी शोधून शिक्षण प्रवाहात आणले. शिक्षक रितेश उमरेडकर व साधन व्यक्ती धीरज जवळकार यांची मदतही त्यांना लाभली आहे.

सालनापूर येथील प्रत्येक विद्यार्थी सूट बुटात येतो. उत्कृष्ट पोषण आहारामुळे ही शाळा राष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे. या शाळेचा आम्हाला अभिमान आहे.

- मुरलीधर राजनेकर गटशिक्षणाधिकारी, पं. स. धामणगाव रेल्वे

Web Title: a teachers efforts and UNICEF took note of the nutritional diet in Salnapur; felicitation ​​of Zilla Parishad School Salnapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.