तिसरे विरोधी पक्षनेताही लवकरच पक्षांतर करतील - आमदार आशिष देशमुख
By उज्वल भालेकर | Published: October 10, 2023 01:52 PM2023-10-10T13:52:51+5:302023-10-10T13:53:51+5:30
भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने २ ऑक्टोंबरपासून पार्डी येथून ओबीसी संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे.
अमरावती - राज्यात जे-जे विरोधी पक्ष नेता राहिले ते भाजप सोबत आले. यात एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा समावेश आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता असलेले वडेट्टीवर हे देखील लवकरच पक्षांतर करतील असे विधान भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख यांनी केले. ओबीसी जागर यात्रेच्या अनुषंगाने त्यांनी मंगळवारी पत्र परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचा डीएनए हा ओबीसींचा असल्याचेही ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने २ ऑक्टोंबरपासून पार्डी येथून ओबीसी संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरु आहे. ९ ऑक्टोंबरला अमरावतीमध्ये ही संपर्क यात्रा झाली. यावेळी आमदार आशिष देशमुख म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचा सर्वाधिक विकास करण्यात आला. मोदींनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात ३५ टक्के म्हणजेच २७ ओबीसी खासदारांना मंत्री केले. तसेच ओबीसींच्या विकासासाठी विविध योजनाही राबविण्यात येत आहे. परंतु कॉँग्रेस नेता राहुल गांधी ओबीसींची दिशाभूल करत आहेत.
राज्यातील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेता असलेले विजय वडेट्टीवर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधी मध्ये वकृत्व शैली नसल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतर विरोधी पक्षनेता प्रमाणे ते देखील लवकरच पक्षांतर करतील असे आ. आशिष देशमुख म्हणाले. यावेळी आमदार तथा शहराध्यक्ष प्रविण पोटे पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, जयंत डेहणकर, शहरउपाध्यक्ष चेतन पवार व इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.