शिवाझिरी शिवारात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, गावात दहशत कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 04:17 PM2023-09-09T16:17:46+5:302023-09-09T16:18:52+5:30
भाऊ मदतीला धावल्याने वाचले प्राण, नातुही होता सोबतीला, माहिती मिळताच वन विभागाच्या चमूने उपचारासाठी केले उपजिल्हा रुग्णालयात दाखल
धारणी (अमरावती) : मेळघाटात सुसर्दा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवाझिरी शिवारात शेतकऱ्यावर पुन्हा वाघाने हल्ला केला. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. त्या शेतकऱ्याला वन विभागाच्या चमूने त्यांच्याच वाहनाने आणून उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.
सुसर्दा वनपरिक्षेत्रांतर्गत दादरा, हिराबंबई, शिवाझिरी ही तीनही गावे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर जंगलव्याप्त परिसरात वसलेली आहेत. या परिसरात मागील दीड महिन्यांपासून वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी शिवाझिरी गावातील शेतकरी नारसिंग घटल्या चोंघड (६५) हे सकाळी साडेआठ वाजता गावालगतच्या शेतात मका पिकाच्या संरक्षणासाठी गेले होते. धुऱ्यावर उभे असताना त्यालगत वनखंड क्रमांक ११८७ मधून वाघ त्यांच्या अंगावर धावून आला. त्याने त्यांच्यावर थेट हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा करताच भाऊ गोरेलाल घटल्या चोंघड हे त्यांच्याकडे धावत गेल्याने वाघ पळून गेला. नारसिंग घटल्या चोंघड यांच्या मानेवर जखम झाली असल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शेतात त्यांचा नातूसुद्धा होता. त्यांनी त्याला घरी जाऊन हल्ल्याची माहिती देण्यास सांगितले. यानंतर मुलगा अर्जुन व गावकरी शेतात गेले आणि नारसिंग यांना गावात आणले.
हल्ल्याची माहिती परिसरात गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाला मिळताच त्यांनी जखमी शेतकऱ्याला वाहनात टाकून धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी उपचार करत असून, सध्या प्रकृती ठीक आहे. वारंवार हल्ले करणाऱ्या त्या वाघाला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिक वारंवार करत आहेत.
वन विभागाकडून शेतीचा मोबदला मिळणार
जंगलाला लागून असलेल्या हिराबंबई, दादरा, शिवाझिरी, गोलाई शिवारात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने येथील शेतकरी शेतातही जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्याची भरपाई मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती संघटनेचे अध्यक्ष मन्नालाल दारसिंबे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर वन विभागाने गुरुवारी परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीचे कृषी विभागाकडून सर्वेक्षण करून शेतीचा मोबदला देणार असल्याचे लेखी पत्र दिले.