बांबू कटाईसाठी गेलेल्या युवकाला वाघाने केले ठार, हरिसाल परिक्षेत्रातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 10:09 AM2024-11-04T10:09:51+5:302024-11-04T10:12:30+5:30
Amravati News: जंगलात वडील, काकांबरोबर बांबू आणण्यासाठी गेलेल्या आदिवासी युवकावर वाघाने हल्ला करीत ठार केले. रविवारी दुपारी १२ वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेने हरिसाल, केसरपूर पंचक्रोशीत दहशत पसरली आहे.
चिखलदरा (अमरावती) - जंगलात वडील, काकांबरोबर बांबू आणण्यासाठी गेलेल्या आदिवासी युवकावर वाघाने हल्ला करीत ठार केले. रविवारी दुपारी १२ वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेने हरिसाल, केसरपूर पंचक्रोशीत दहशत पसरली आहे. वाघाला जेरबंद किंवा ठार करा, या मागणीसाठी परिसरातील पाचशेवर आदिवासींनी ठिय्या आंदोलन चालविले आहे. या दरम्यान, जंगलातून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
हरिराम गंगाराम धिकार (३२, रा.केसरपूर, ता.चिखलदरा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तो वडील गंगाराम धिकार व काका चिंताराम धिकार यांच्यासह रविवारी सकाळी ९ वाजता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत हरिसाल वनपरिक्षेत्रातील माताखोल जंगलात बांबू आणण्यासाठी गेला होता. हरिराम न आल्याने वडील आणि काका त्याला शोधण्यासाठी जंगलात गेले. काही अंतरावर त्यांना जमिनीवर धड ओढत नेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गावातील आदिवासी बांधवांना आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. सर्व जण जंगलात गेले. तेथे हरिरामचा मृतदेह आढळला. व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.
वाघाला जेरबंद करा; आदिवासींचा ठिय्या
- चिखली आणि परिसरात यापूर्वीही वाघाने जंगलात व घरात शिरून आदिवासींना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत.
- त्याची पुनरावृत्ती रविवारी झाल्याने परिसरातील हरिसाल, चिखली, कारा, नांदुरी, केसरपूर, भिरोजा, चित्री, तारूबांदा परिसरात एकच दहशत पसरली आहे. माताखोल येथे पंचक्रोशीतील ५०० पेक्षा अधिक आदिवासींनी गर्दी केली होती.
- वाघाला जेरबंद करा किंवा ठार करा, अशी मागणी करीत आदिवासी एकवटले होते.
जंगलात एका आदिवासीचा मृतदेह आढळून आला. त्याबाबत पूर्ण तपास सुरू आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे.
- सुमंत सोळंके, उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा.