वाघाला मारून अवयव काढली; पाच आरोपींना तीन वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:29 AM2024-09-06T11:29:57+5:302024-09-06T11:31:05+5:30
न्यायालयीन निर्णय : सन २०१३ मध्ये आढळला होता मृत वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाघाची शिकार करून सापळ्यामधून नखे व दात काढून घेणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक न्यायालयाने तीन वर्षे कारावास, प्रत्येकी १० हजार रुपये दंड, न भरल्यास प्रत्येकी तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी क्रमांक आठ आर. टी. घोगले यांच्या न्यायालयाने ४ सप्टेंबर रोजी हा निर्णय दिला. तब्बल ११ वर्षानंतर हा निर्णय आला आहे.
पूर्व मेळघाट विभागातील कुंडी सर्व्हे नं.१, अंबापाटी बिट, टेंबूरसोंडा राऊंड, जामली परिक्षेत्रात ऑक्टोबर २०२३ मध्ये वाघाच्या शिकारीची ती घटना उघड झाली होती. शिक्षाप्राप्त आरोपींमध्ये नानाजी भुरा साकोम, बाबुलाल भुरा साकोम, सुनील बिसराम मावसकर, सुंदरलाल जंगल्या माडेकर आणि सुरेश रंगू बेलकर (सर्व रा. चिखलदरा. जि. अमरावती) यांचा समावेश आहे. याप्रकरणी, पूर्व मेळघाट वन विभागाच्या सहायक वन संरक्षकांनी वनगुन्हा दाखल केला होता.
२०१३ रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबापाटी बिटमध्ये वन अतिक्रमण तपासणी केली. त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी जनावर कुजल्याचा वास आला. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी खोदून पाहिले असता त्या ठिकाणी त्यांना झाडांचा पाला व फांद्याने जनावर झाकून ठेवल्याच्या स्थितीत आढळून आले. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०२३ रोजी पंचनामादरम्यान ती जागा खोदली असता तेथे सडलेल्या कातडीसह वाघाचा सापळा आढळून आला. सापळ्यामधून संबंधित वाघाचे नखे आणि दात काढून घेतल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला.