पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन
By उज्वल भालेकर | Published: April 1, 2024 07:24 PM2024-04-01T19:24:46+5:302024-04-01T19:24:53+5:30
इंदिरा गांधी नगरात वर्षभरापासून पाणी टंचाई असल्याचा भीम ब्रिगेडचा आरोप
अमरावती : शहरातील लोकमाता इंदिरा गांधीनगर (व्यंकयापुरा ) येथे मागील एक वर्षापासून पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला वारंवार यासंदर्भात माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भीम ब्रिगेडने सोमवारी जीवन प्राधिकरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील लोकमाता इंदिरा गांधीनगर (व्यंकयापुरा ) हा झोपडपट्टी परिसर असून येथे बहुसंख्य प्रमाणात मजूर वर्ग रहिवासी आहेत. या परिसरात मागील एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे. या भागामध्ये रात्री १ वाजता पाणीपुरवठा करण्यात येत असून तो पहाटे बंद केला जातो. त्यामुळे पाण्यासाठी येथील मजूर वर्गाला रात्रभर जागरण करावे लागत आहे. तर याच परिसराला लागून असलेल्या इतर कॉलनी परिसरात मात्र सकाळी ६ ते १० या वेळेत पाणीपुरवठा केला जात आहे.
त्यामुळे यासंदर्भात परिसरातील रहिवासी नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यातही पाइपलाइनला फोर्स नसल्याने नळाला कमी धार असल्याने एक ते दोन तासात पूर्ण पाणी भरणेही अशक्य आहे. त्यामुळे भीम ब्रिगेड संघटनेचे राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात स्थानिक महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी रात्रीचा पाणी पुरवठा बंद करून तो सकाळी करण्यात यावा तसेच नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. चार दिवसांमध्ये योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.