तुला तर मृत्यूच परवडेल, मरून जा.. महिलेशी वाद घालून शिवीगाळ, 'तिने' उचलले टोकाचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 06:38 PM2022-05-31T18:38:50+5:302022-05-31T18:45:18+5:30
आपल्या पत्नीला अनिता हिनेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मृताच्या पतीने नोंदविली. शिरखेड पोलिसांनी आरोपी अनिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली.
अमरावती : मरून जा, तुला हे शोभते का? असे म्हणून अर्वाच्चपणे भांडणारी महिला घराबाहेर पडल्यानंतर, त्या वादाला सामोरे जाणाऱ्या एका विवाहितेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव येथे ७ मे रोजी सायंकाळी ५ ते ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी ३० मे रोजी रात्री ९.०३ वाजता मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून अनिता नामक ३५ वर्षीय महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी व्यक्तीची पत्नी व त्या गावातील एका पुरुषाचे बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्या संबंधांबाबत त्या व्यक्तीची आई अनिता हिला माहिती झाले. त्यामुळे ७ मे रोजी सायंकाळी ५च्या सुमारास अनिता फिर्यादीच्या घरी पोहोचली. त्यावेळी फिर्यादी व्यक्तीची पत्नी घरी एकटीच होती. तिने फिर्यादीच्या पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. माझ्या मुलाला नादी लावलेस, तुला हे शोभते का, तुला तर मरणेच परवडेल, तू मरून जा, अशा शब्दांत तिच्याशी वाद घातला. तिच्याशी लोंबाझोंबी केली. तिला अद्वातद्वा बोलल्यानंतर, अनिता निघून गेली. आरोपी अनिताच्या त्या अश्लाघ्य कृत्याचा फिर्यादीच्या पत्नीच्या मनावर विपरीत परिणाम झाला. ती मोठ्याने व शिवराळ बोलल्याने ती बाब शेजाऱ्यांच्या देखील कानावर गेली. त्यामुळे आता जिणं नकोच, म्हणून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या पत्नीला अनिता हिनेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मृताच्या पतीने नोंदविली. शिरखेड पोलिसांनी आरोपी अनिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली.
मृताच्या पतीला अलीकडे त्या प्रकाराची माहिती झाली. त्यामुळे त्याने ३० मे रोजी रात्री ९च्या सुमारास तक्रार दाखल केली. गावातीलच एका ३५ वर्षीय महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. तपास सुरू आहे.
हेमंत कडुकार, ठाणेदार, शिरखेड