धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: December 23, 2023 10:52 PM2023-12-23T22:52:50+5:302023-12-23T22:53:13+5:30
त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ५ मे २०२३ नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे.
अमरावती : जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे. २१ वर्षीय तरुण येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता. त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ५ मे २०२३ नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे.
धामणगाव तालुक्यातील हा रुग्ण आहे. अन्य आजारासाठी तो सुपरमध्ये दाखल होता. संक्रमित झाल्यानंतर त्याला कोरोना रुग्णांसाठी असलेल्या १० नंबरच्या वॉर्डात उपचारार्थ ठेवण्यात आलेले आहे. त्याची प्रवासाची पार्श्वभूमी नसली तरी त्यांच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यात येणार आहे. त्याला कोरोनाची फारसी लक्षणे नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत नऊ नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यामध्ये एक पॉझिटिव्ह नोंदविला आहे. हा नमुना आता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर हा कोणता व्हेरिएंट आहे, याची माहिती मिळेल, अशी माहिती विद्यापीठ लॅबचे समन्वयक डाॅ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितले.
टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. नागरिकांनी दक्षता घ्यावी, संभाव्य तयारीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाचे मॉकड्रील करण्यात आले आहे.
- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी