पोलिस कर्मचाऱ्याकडून तरुणीवर अत्याचार, धारणी पोलिसात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 12:29 PM2023-04-17T12:29:24+5:302023-04-17T12:29:58+5:30
लग्नासाठी पसंती दाखवून फसगत
धारणी (अमरावती) : लग्नासाठी आई-वडिलांदेखत पसंत केलेल्या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर तिला नाकारणाऱ्या लातूरच्या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध धारणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजेश मोतीराम कासदेकर (२७) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनुसार, धारणी शहरातील एका वॉर्डात आई, भाऊ-वहिनीसोबत तरुणी वास्तव्यास आहे. तिच्या भावाच्या मित्राने एक उपवर मुलगा लातूर पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगत त्याला त्या तरुणीचे छायाचित्र पाठविले. जानेवारी २०२२ मध्ये आरोपी राजेशचे आई-वडील तिला पाहण्यासाठी येत असल्याचा निरोप भावाच्या मित्राने दिला. त्यांनीही राजेशचे छायाचित्र पीडित तरुणीच्या कुटुंबियांना दाखविले. तेथून पंधरा दिवसांनी आरोपी राजेशने तरुणीच्या मोबाइलवर पसंती दर्शविली. त्यानंतर वारंवार त्याचे मेसेज येत होते. तरुणीने त्याला वारंवार लग्न करण्याबाबत छेडले, तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेव, असे तो सांगत होता.
या दरम्यान त्याने तिचे घर गाठून तिच्याशी शारीरिक संबंधदेखील प्रस्थापित केले. १० जानेवारीला ती घरी असताना राजेश आला. त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि निघून गेला. यानंतर तिने मेसेज करत लग्नाबाबत विचारले तेव्हा ‘मी कोणाशी बोलणार नाही, तुझ्याशी लग्न करायचे नाही,’ असे सांगून मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. त्याच्या आई-वडिलांनी अन्य संपर्क सूत्र नसल्याचे सांगत हात वर केले. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच तरुणीने धारणी पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून आरोपी पोलिस कर्मचारी राजेश कासदेकर याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रिना सरदार करत आहेत.
फिर्यादीची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
- सुरेंद्र बेलखेडे, पोलिस निरीक्षक, धारणी