अबब! मातीचे घर ४५ लाखांचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:30 AM2019-05-12T01:30:00+5:302019-05-12T01:30:26+5:30
निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या खोपडा येथील घरांच्या मूल्यांकनातील अनियमिततेवर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या अहवालाने शिक्कामोर्तब केले. या घोळाची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी खोपडा ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या खोपडा येथील घरांच्या मूल्यांकनातील अनियमिततेवर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या अहवालाने शिक्कामोर्तब केले. या घोळाची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी खोपडा ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली.
ग्रामपंचायत सदस्य सचिन वानखडे यांच्या एकाच कुटुंबाच्या घराचे मूल्यांकन १ कोटी १७ लाख रुपये, तर उपसरपंच हरिदास लुंगे यांच्या घराचे मूल्यांकन ५१ लाख ८५ हजार रुपये दाखविले आहे. रोजंदारी कर्मचारी अजिंक्य लुंगे यांचे घर ५७ लाख ८६ हजारांचे दाखविले, तर मातीच्या अन्य घरांचा मोबदला २ ते १० लाखांच्या घरात आहे. मोजक्याच लोकांच्या घरांचे मूल्यांकन अर्धा ते एक कोटीच्या घरात कसे गेले, असा ग्रामस्थांचा रोकडा सवाल आहे. घरांच्या सर्वेक्षणात मूल्यांकन अधिकारी, सरपंच, ग्रामसचिव व सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर घोळ केल्याच्या निषेधार्थ खोपडा येथील ५०० ते ५५० महिला-पुरुषांनी २६ फेब्रुवारीपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यावर प्रशासन हादरले व खोपडा गावातील संपादित घरांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने घरांच्या मूल्यांकनाबाबत कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून ग्रामपंचायतला अहवाल प्राप्त झाला. अहवालही सदोष
मूल्यांकन अहवालामध्ये घर क्रमांक, घरमालकांचे नाव, घराची किंमत व एकूण रक्कम इतकेच रकाने दर्शविण्यात आले. अहवालात घराचे चौरस क्षेत्रफळ, मातीचे की सिमेंटचे, याची कोणतीही नोंद नाही. कोणत्या दराने घराचे मूल्यांकन केले, याची माहिती अहवालात नाही.
दोषींवर व्हावी कारवाई
बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदधिकारी हे सर्व घटक अनियमिततेस जबाबदार असल्याने त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अन्यथा उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.
काय आहे अहवालात?
गावातील एका मातीच्या घराचे मूल्यांकन ४५ लाख ६० हजार दाखविले आहे तसेच घर क्रमांक ४३ चे मूल्य दोनवेळा दर्शविले आहे. एका सिमेंटच्या घराचे मूल्य ६२ लाख ३० हजार रुपये दर्शविण्यात आले. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मूल्यांकन अधिकाºयांना हाताशी धरून घरांच्या किमती वाढवून घेतल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.