मातंग समाजाचा विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश; लोटांगण आंदोलन करून शासनापुढे मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 06:06 PM2022-05-17T18:06:20+5:302022-05-17T18:13:37+5:30

आक्रोश आंदोलनामध्ये महाविकास आघाडी सरकारचे प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

Aakrosh March of Matang Samaj at the Divisional Commissioner Office Amravati | मातंग समाजाचा विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश; लोटांगण आंदोलन करून शासनापुढे मांडल्या व्यथा

मातंग समाजाचा विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश; लोटांगण आंदोलन करून शासनापुढे मांडल्या व्यथा

Next

अमरावती : राज्यात मांतग समाजावरील वाढत्या अत्याचार तसेच मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालावर लहुजी शक्ती सेनेच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लोटांगण आंदोलनातून मातंग समाजाने सरकारवर रोष व्यक्त करीत विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारी विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

राज्यात वर्षभरात मातंग समाजावरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा लहुजी शक्ती सेनेचा आक्षेप आहे. वाढत्या अत्याचाराविरोधात अनेकवेळा निवेदन, आंदोलन करूनही मातंग समाजाला न्याय मिळत नसल्याचे  आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. गर्ल्स हायस्कूल चौकातून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीला हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार होते. परंतु या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असल्याने हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मातंग समाजाच्या बांधवांनी लोटांगण आंदोलन करून सरकारचे विविध मागण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

महाविकास आघाडीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मांतग समाजावरील जातीय द्वेषातून होणारे अन्याय अत्याचार वाढल्याचे लहुजी शक्ती सेनेचा आरोप आहे. त्यामुळे आक्रोश आंदोलनामध्ये महाविकास आघाडी सरकारचे प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

या आहेत मातंग समाजाच्या मागण्या

राज्यातील मातंग समाजावरील वाढते अत्याचार थांबवा, अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाच्या अ, ब, क, ड नुसार मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये मागेल त्याला विना जामीनदार कर्ज देण्यात यावे, डॉ. संतुजी लाड आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, कोरेाना काळात उपासमारी सहन केलेल्या मातंग समाजातील बँन्ड व्यवसायीकांना २ लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे. आदी विविध मागण्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर वाल्मिकी समाज तसेच चर्मकार समाजाचेही प्रश्न या आंदोलनातून मांडण्यात आले.

Web Title: Aakrosh March of Matang Samaj at the Divisional Commissioner Office Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.