आमिर खानचे आगमन; सुरक्षेचा अतिरेक
By admin | Published: April 21, 2016 12:00 AM2016-04-21T00:00:00+5:302016-04-21T00:00:00+5:30
‘पानी फाऊंडेशन’च्या सत्यमेव जयते ‘वॉटर कप-२०१६’ स्पर्धेत सहभागी वरूड तालुक्यातील अधिकारी,
‘कलेक्ट्रेट’ची नाकाबंदी : कर्मचाऱ्यांनाही प्रवेशास मज्जाव, सेतू सुविधाही बंद, नागरिकांची अडवणूक
अमरावती : ‘पानी फाऊंडेशन’च्या सत्यमेव जयते ‘वॉटर कप-२०१६’ स्पर्धेत सहभागी वरूड तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बुधवारी सकाळी १० वाजता सिने अभिनेता आमिर खान यांचे बचत भवनात आगमन झाले. या दौऱ्याबाबत जिल्हा प्रशासनाने कमालीची गुप्तता बाळगली. मात्र, जिल्हा प्रशासनाने सुरक्षेचा अक्षरश:अतिरेक केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनादेखील कार्यालयात प्रवेशासाठी मज्जाव करण्यात आला. नागरिकांनाही कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. इतकेच काय तर सेतू सुविधा देखील दुपारी २ पर्यंत बंद ठेवण्यात आली. यामुळे गरजू नागरिकांची गोची झाली. आमिर खान येणार म्हणून अगदी पहाटेपासूनच नागरिकांना या परिसरात प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. आमीर खानच्या दौऱ्यासाठी अनेक घटकांना वेठीस धरल्याने जिल्हा प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला जात होता.
‘पानी फाऊंडेशन’च्यावतीने राज्यात ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा-२०१६ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार २० एप्रिलपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राज्यातील ३ तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यामधील ६६ गावांचा सहभाग आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने या गावांची तयारी, त्यांचे आराखडे याची माहिती जाणून घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अभिनेता आमिर खान सकाळी १० वाजता बचत भवनात आले होते. वलयांकित व्य्क्तिमत्त्व आणि प्रसिध्द अभिनेता असल्याने आमिर खान यांच्या चाहत्यांची ऐनवेळी होणारी गर्दी अपेक्षित असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पहाटे ६ वाजतापासून सुरक्षाव्यवस्थेचा वेढा घालण्यात आला. जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या नावावर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून जो अतिरेक केल्याने सर्वत्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावर रोखण्यात आल्याने त्यांना ओळखपत्र दाखवून आत सोडण्याच्या सूचना दिल्यात. यापूर्वी आंबेजोगाई व गोरेगाव येथे आमिर खानच्या कार्यक्रमात लाठीहल्ला झाल्याने हा बंदोबस्त होता.
- किरण गित्ते, जिल्हाधिकारी
आमिर खान यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कोणालाही आत प्रवेश न देण्याच्या सूचना होत्या.
- दत्तात्रेय मंडलिक,
पोलीस आयुक्त
दीडशे पोलिसांचा ताफा
अभिनेता आमिर खान यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व बचतभवन परिसरात तब्बल दीडशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक, १० महिला पोलिसांसह एकूण दीडशे पोलिसांचा बंदोबस्त होता. तसेच दंगानियंत्रण पथक ‘स्ट्राईकिंग फोर्स’ सुद्धा तैनात करण्यात आली होती.