अमरावतीतील तिवसा येथे तीन महिन्यांपासून 'आपला दवाखाना' बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 12:53 PM2024-08-01T12:53:38+5:302024-08-01T12:54:54+5:30

Amravati : रुग्ण आरोग्य सुविधेपासून वंचित, रजेवर गेलेले डॉक्टर बेपत्ता पदेही आहेत रिक्त

'Aapla Dawakhana' has been closed for three months at Tivasa in Amravati | अमरावतीतील तिवसा येथे तीन महिन्यांपासून 'आपला दवाखाना' बंदच

'Aapla Dawakhana' has been closed for three months at Tivasa in Amravati

संदीप राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क 
तिवसा :
मुंबईसह संपूर्ण राज्यात शिंदे सरकारने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही आरोग्य योजना सुरू केली आहे. त्यानुसार २५ ते ३० हजार लोकसंख्येच्या ठिकाणी एक दवाखाना सुरू करण्यात आला. तिवसा येथील दवाखान्यात गेल्या तीन महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिकांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. आपलाच दवाखाना आता आपला राहिला नसल्याची भावना नागरिकांमध्ये दृढ होऊ लागली आहे. 


शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना कार्यान्वित केली आहे. आपला दवाखान्यात एकूण १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात प्राथमिक उपचाराशिवाय येथे अन्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना शासकीय रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. शासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपला दवाखाना ही आरोग्यदायी योजना सुरू केली असली तरी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचा ताळमेळ नसल्यामुळे आपला दवाखाना शोभेची वस्तू ठरत आहे. तिवसा शहरातील आपला दवाखाना गेल्या तीन महिन्यांपासून बंद पडला असून एक महिन्याच्या रजेवर गेलेले येथील वैद्यकीय अधिकारी तीन महिने लोटून अद्यापही दवाखान्यात परतले नाहीत. त्यामुळे शासनाने सुरू केलेली ही आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.


नागरिकांमध्ये संभ्रम
आपला दवाखान्यात योग्य उपचार होत नसून प्रत्येक रुग्णाला एकाच प्रकारचे औषधी देण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या दवाखान्याकडे पाठ फिरवून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती स्थानिकांकडून प्राप्त झाली आहे.


या सुविधा नावालाच 
आपला दवाखान्यात तज्ज्ञांअभावी कान, नाक, घसा, त्वचारोग, हाडासंबंधी उपचार, नेत्र चिकित्सा, दंतशल्य चिकित्सा, बालरोग, स्त्रीरोग अशा विविध आरोग्य सुविधा पुरविण्याची तरतूद असली तरी; पण उपरोक्त्त सुविधा पुरविण्यात आपला दवाखाना अपयशी ठरत आहे.


"आपला दवाखानामध्ये ११ महिन्यांच्या करारावर कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात येतात. त्यामुळे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळत नाही. तिवस्याला नवीन वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी लवकरच मुलाखती घेतल्या जातील."
- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी.
 

Web Title: 'Aapla Dawakhana' has been closed for three months at Tivasa in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.