‘आपली परिवहन बस’ने चिमुकल्याला चिरडले, बहिणही जखमी

By प्रदीप भाकरे | Published: July 14, 2024 03:07 PM2024-07-14T15:07:08+5:302024-07-14T15:07:43+5:30

आजीसोबत एका धार्मिक कार्यक्रमाला जात असलेल्या चुलत बहीण-भावाला येथील शहर बसने जोरदार धडक दिली. या अपघातात नऊ वर्षीय चिमुकल्या भावाचा बसच्या चाकाखाली चिरडून दुर्देवी मृत्यू झाला.

'Aapli Transport Bus' Crushes small boy, Sister Also Injured in amravati | ‘आपली परिवहन बस’ने चिमुकल्याला चिरडले, बहिणही जखमी

‘आपली परिवहन बस’ने चिमुकल्याला चिरडले, बहिणही जखमी

अमरावती : आजीसोबत एका धार्मिक कार्यक्रमाला जात असलेल्या चुलत बहीण-भावाला येथील शहर बसने जोरदार धडक दिली. या अपघातात नऊ वर्षीय चिमुकल्या भावाचा बसच्या चाकाखाली चिरडून दुर्देवी मृत्यू झाला. तर त्याची थोरली बहिण जखमी झाली. १४ जुलै रोजी सकाळी १०.१० वाजताच्या कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील सायन्सकोर प्रांगणाच्या प्रवेशद्वारासमोर हा हृद्यद्रावक अपघात घडला. अपघातानंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली.

प्रितम गोविंद निर्मळे (९) असे मृत तर वैष्णवी संजय निर्मळे (१२) असे जखमीचे नाव आहे. चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील रहिवासी नर्मदा लक्ष्मणराव निर्मळे (६०) या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी सकाळी नातू प्रितम, नाती वैष्णवी व नेहा संतोष निर्मळे (१४) यांच्यासह एसटी बसने अमरावतीला आल्या. येथील मध्यवर्ती बसस्थानकावर उतरल्यावर ते सर्व सायन्सकोर प्रांगणाच्या द्वारासमोरून रुक्मिणीनगर चौकाकडे धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनस्थळी जात होते. त्यावेळी मागून आलेल्या शहर बस क्रमांक एमएच २७ ए ९९५२ ने अचानक प्रितम व वैष्णवीला धडक दिली. या अपघातात प्रितम हा बसच्या चाकाखाली आला. त्यात चिरडून त्याचा मृत्यू झाला. तर वैष्णवी ही जखमी झाली.

आजींचा आक्रोश अन् तोडफोड

डोळ्यादेखत नातू गतप्राण झाल्याचे दिसताच आजी नर्मदा यांनी एकच आक्रोश केला. त्या आक्रोशाने प्रत्यक्षदर्शींचे मन देखील हेलावले. त्यामुळे संतप्त जमावाने बसची चांगलीच तोडफोड केली. त्यामुळे तणाव देखील निर्माण झाला. माहिती मिळताच कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलिसांनी जखमी वैष्णवीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून प्रितमच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी शहर बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Web Title: 'Aapli Transport Bus' Crushes small boy, Sister Also Injured in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.