"म्हातारा झाला म्हणून रस्त्यावर सोडला", आंधळा आणि म्हाताऱ्या 'जितू'ला वसाने केले रेस्क्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 09:40 PM2024-06-10T21:40:23+5:302024-06-10T21:40:33+5:30
आयुष्यभर घेणार काळजी; वसाने दिली माहिती
मनीष तसरे, अमरावती: आजच्या या आधुनिक युगात माणूस भरपूर प्रगती करतोय, भरमसाट पैसा कमावतोय. मात्र, माणुसकी विसरत चालला आहे. काही प्राणी ज्यांचे मनुष्याला काम असताना त्यांचा भरपूर उपयोग करून घेतला जातो. त्यांच्या मदतीने पैसा कमावला जातो. मात्र, जेव्हा ते म्हातारे होतात, आजारी असतात, जखमी असतात, तेव्हा मात्र त्या प्राण्यांना रस्त्यावर बेवारस सोडून देण्यात येते.
अशीच एक घटना शहरात समोर आली आहे. कठोरा नाका परिसरातील नवजीवन कॉलनीमधून एक बेवारस घोडा वसा संस्थेच्या ॲनिमल्स रेस्क्यू टीमने रेस्क्यू केला आहे.
प्राणिप्रेमी इशांत डाहत यांना त्यांच्या परिसरात एक जखमी आणि आंधळा घोडा अत्यंत दयनीय परिस्थितीत आढळून आला. त्यांनी लगेच वसा संस्थेच्या ॲनिमल्स रेस्क्यू हेल्पलाइनवर सदर घोड्याची माहिती दिली. माहिती मिळताच वसा संस्थेचे सहायक पशु चिकित्सक गणेश अकर्ते, रेस्क्युअर ऋग्वेद भैसे, मोहन मेशेकर आणि चालक नितीन सातोटे यांनी नवजीवन कॉलनीत पोहचून त्या घोड्याचा शोध घेतला. मागच्या पायाने जखमी असलेल्या घोड्याला लगेच दोराच्या साह्याने रेस्क्यू करत मंगलधाम कॉलनीस्थित श्री गोरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. इथे डॉ. सुमित वैद्य यांनी या घोड्याची तपासणी केली. ज्यामध्ये त्याच्या मागच्या पायाला "कोरोनायटीस" झाल्याचे त्यांनी निदान केले.
रेस्क्यू केलेल्या या घोड्याला दोन्ही डोळ्यांनी फार कमी दिसत असल्याने तो बेचैन झाला होता. वसा संस्थेत या घोड्यावर दररोज उपचार केले जात आहेत.
"जितूला आता वसा सांभाळणार"
नवजीवन कॉलनी येथून रेस्क्यू केलेल्या या घोड्याला सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर त्याचे नामकरण 'जितू' असे करण्यात आले आहे. जितू म्हातारा असल्याने त्याची विशेष काळजी आणि देखभालीची गरज आहे. कोरोनायटीसमुळे त्याला फार जास्त चालता येत नाही. दृष्टी फार कमी असल्याने तो रस्त्यावर जास्त दिवस जगू शकणार नाही. त्यामुळे आम्ही जितूला त्याच्या संपूर्ण जीवनभर सांभाळणार आहोत. नागरिकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांना जखमी अवस्थेत असे रस्त्यावर सोडू नये.
-गणेश अकर्ते, सहायक पशु चिकित्सक, वसा संस्था, अमरावती