‘एक बच्ची का बाप’ प्रेयसीसोबत ‘लिव्ह इन पुणे; वारंवार बलात्कार, लग्नास नकार
By प्रदीप भाकरे | Updated: July 10, 2023 14:12 IST2023-07-10T14:11:14+5:302023-07-10T14:12:45+5:30
विवाहित असताना तरूणीला पळविले

‘एक बच्ची का बाप’ प्रेयसीसोबत ‘लिव्ह इन पुणे; वारंवार बलात्कार, लग्नास नकार
अमरावती : एका अविवाहित तरूणीला पुण्यात पळवून नेत, तिच्यासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी २३ वर्षीय पिडिताच्या तक्रारीवरून आरोपी रणजीत गजानन इंगळे (२७, रा. सांगळूदकरनगर, दर्यापूर) याच्याविरूद्ध ९ जुलै रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे आरोपी रणजित हा विवाहित असून एक वर्षे वयाच्या मुलीचा पिता देखील आहे.
तक्रारीनुसार, आरोपी व पिडिता हे परस्परांना ओळखत होते. सन २०१९ पासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांमध्ये सोशल मिडियावर व्यक्त होण्यासोबतच कॉलवर संवाद देखील बहरला. त्यातून त्याने तिला लग्नाच्या आणाभाका दिल्या. आपण लग्न करणारच आहोत, अशी बतावणी करून त्याने डिसेंबर २०१९ पासून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार तो तिच्यावर शारीरिक बळजबरी करू लागला. दरम्यान २०२० मध्ये आरोपी रणजीतने पिडिताला दूर ठेऊन दुसऱ्याच तरूणीशी लग्न केले. त्याने ती बाब तिच्यापासून दडवून ठेवली. काही दिवसांनी ती बाब तिला समजताच तिने आकाशपातळ एक केले.
लग्नाच्या उद्देशाने पळविले
दरम्यान आरोपी पहिलेच विवाहित असताना त्याने पिडित तरूणीला लग्नाच्या उद्देशाने पुणे येथे पळवून नेले. तेथे काही दिवस ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्या मुक्कामात देखील त्याने पिडिताशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दुसरीकडे पती दुसऱ्याच तरूणीसोबत पुण्याला पळून गेल्याचे समजताच रणजीतचा त्याच्या पत्नीशी देखील कडाक्याचा वाद झाला. तर दुसरीकडे पिडिताने रणजितकडे लग्नाचा हेका धरला. मात्र त्याने लग्नास नकार दिल्याने पिडिताने शनिवारी दर्यापूर पोलीस ठाणे गाठले.
आरोपी विवाहित आहे. आरोपीने आपल्याला लग्नाच्या उद्देशाने पुण्याला पळवून नेल्याची तक्रार पिडिताने नोंदविली. तिच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध अतिप्रसंग व अपहरणाचा गुन्हा नोंदविला. आरोपीला तातडीने अटक केली जाईल.
- संतोष ताले, ठाणेदार, दर्यापूर